कर्नाटकने केला अभ्यासक्रमात बदल, भाजपकडून निषेध
मुंबई, 16 जून : कर्नाटक सरकारने शालेय अभ्यासक्रमातून काही धडे वगळले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांचे धडे अभ्यासक्रमातून वगळल्याने आता वाद निर्माण झाला आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी कर्नाटक सरकारचा हा निर्णय तुघलकी असल्याचं म्हणत निषेध केला आहे. तसंच उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आता काय वगळणार? काँग्रेस की सावरकर असा प्रश्नही त्यांनी विचारलाय. आशिष शेलार म्हणाले की, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक प. पू. डॉ. हेडगेवार यांचे धडे पाठ्यपुस्तकातून वगळण्याच्या कार्नाटक सरकारच्या तुघलकी निर्णयाचा आम्ही निषेध करतो. काँग्रेसवाल्यांनो, तुम्ही देशाच्या अशा महान सुपुत्रांचे धडे पाठ्यपुस्तकातून वगळालही पण जनतेच्या मनातून आणि इतिहासाच्या पानातून त्यांचे महान कार्य कधीच वगळू शकणार नाही. विशाळगडावरील दर्ग्यात पशुबळीच्या मुद्द्याला धार्मिक रंग नका देऊ, हायकोर्टाने सुनावले उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना आशिष शेलार यांनी म्हटलं की, महाराष्ट्रातील तथाकथित हिंदुत्ववादी “उबाठा” आता काय वगळणार? काँग्रेस की सावरकर? काँग्रेसच्या असल्या 60 वर्षांच्या कारभाराला कंटाळून जनतेने त्यांना देशातूनच वगळून टाकायचे ठरवलेय. तर काँग्रेसला साथ देणाऱ्या “उबाठा"ला आमदारांनी शिवसेनेतून वगळलेच आता महाराष्ट्रातील जनताही लवकरच वगळेल. कर्नाटक मंत्रीमंडळाने शालेय अभ्यासक्रमात बदलाला मंजुरी दिली आहे. राज्य मंत्रिमडंळाने शाळेत कन्नड आणि सामाजिक शास्त्र पुस्तकातून आरएसएस संस्थापक डॉक्टर हेडगेवार आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे धडे वगळण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या जागी जवाहरलाल नेहरू, बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, चक्रवर्ती सुलिबेले आणि इंदिरा गांधी यांच्या धड्यांचा अभ्यासक्रमात समावेश केला जाणार आहे. याशिवाय शाळांमध्ये संविधानाची प्रस्तावना बंधनकारक केली आहे. या बदलासाठी सरकार विधानसभेच्या आगामी अधिवेशनात एक प्रस्ताव मांडणार आहे.