नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 22 मे : मराठवाड्यात नैसर्गिक पाऊसमान कमी होत असल्याने पाणी टंचाई समस्येवर मात करण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न होत असतात. यामुळे जालना शहरातील कृषी विज्ञान केंद्र खरपुडीच्या साह्याने बदनापूर तालुक्यातील कडेगाव या गावाने जलसंधारण आणि व्यवस्थापनात उत्कृष्ट कामगिरी केल्याने देशात तिसऱ्या क्रमांक पटकावला आहे. केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने जलसंपदा संवर्धन आणि व्यवस्थापन क्षेत्रातील विविध श्रेणींसाठी चौथ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांची घोषणा नुकतीच केलीय. यात बदनापूर तालुक्यातील कडेगाव ग्रामपंचायतची राष्ट्रीय जल पुरस्कार- 2022 च्या सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत श्रेणीमध्ये तृतीय क्रमांकाच्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. कशी झाली निवड? कडेगाव हे गाव खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राने निक्रा प्रकल्पांतर्गत 2015-16 मध्ये दत्तक घेतले. आमच्या गावात भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार विविध हवामान अनुकूल उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्यापैकी नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन या घटकांतर्गत गावात विविध उपक्रम गावकऱ्यांच्या सहकार्याने राबविण्यात आले आहेत. विविध यशस्वी उपक्रमांमुळे गावाची पुरस्कारासाठी निवड झाली असल्याचे सरपंच दत्तात्रय निंबाळकर यांनी सांगितले.
ग्रामस्थांचाही उत्स्फूर्त सहभाग कडेगाव गावच्या शिवारात शासकीय योजनांच्या माध्यमातून उपक्रम राबविण्यात आले आहेत. कृषी विज्ञान केंद्रासह प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. या शासकीय योजनांच्या अंमलबजावणीमध्ये कडेगाव येथील शेतकरी, ग्रामस्थांचाही उत्स्फूर्त सहभाग राहिला.
शेतकऱ्यांनो, तुमच्या अडचणी होणार एका क्लिकमध्ये दूर, घरबसल्या घ्या मोफत फायदा, Video
असे राबविले विविध उपक्रम कडेगाव शिवारात सिमेंट नाला बांधमधील गाळ काढणे, पाझर तलावातील गाळ काढणे, भूमिगत प्लास्टिक बंधारा, कृत्रिम विहीर पुनर्भरण, विहिरींचे पुर्नभरण, शेततळ्यातील गाळ काढणे, वाळूच्या गोण्या दाबून चेकडॅम, भूमिगत प्लास्टिक बंधारे तयार करण्यात आले. यांचं बरोबर बांधबंदिस्तीसह कमी पाण्यावर येणारी पिके जसे तुती (रेशीम उद्योग), गव्हाऐवजी कमी पाण्यावर येणारी ज्वारी, हरभरा या पिकांना प्रोत्साहन, कापूस मूग, सोयाबीन तूर, अशा आंतरपीक पद्धतींना प्रोत्साहन, सोयाबीन आणि हरभरा पिकांसाठी बीबीएफचा वापर, कापूस पिकात ठिबकचा वापर, पाणलोट क्षेत्र आधारित उपक्रम नवीन शेततळी, शेतीचे यांत्रिकीकरण याशिवाय विविध उपक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी करण्यात आली आहे.