JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अडीच एकर द्राक्ष बाग काही क्षणात भुईसपाट, शेतकऱ्याचे लाखो रूपये पाण्यात, Video

अडीच एकर द्राक्ष बाग काही क्षणात भुईसपाट, शेतकऱ्याचे लाखो रूपये पाण्यात, Video

Jalna News : अडीच एकरावरील द्राक्ष बाग भुईसपाट झाली आहे. यामुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 22 मार्च :  जालना जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतीच मोठं नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील नंदापूर येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी गंगाधर उबाळे यांची रात्रंदिन काबाडकष्ट करून जोपासलेली अडीच एकरावरील द्राक्ष बाग  भुईसपाट झाली आहे. यामुळे गंगाधर उबाळे यांचे 8 ते 10 लाखांचे नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेली बाग कोसळल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. कष्टाने बाग जोपासली नंदापूर येथील शेतकरी गंगाधर यांच्या शेतात अडीच एकरवर द्राक्ष बाग होती. त्यांचे कुटुंबीय शेतात राहूनच द्राक्षबाग जोपासत होते. वर्षभर मोठ्या कष्टाने ही बाग जोपासली होती. अडीच एकरातील दीड हजार खोडांवर जवळपास साडेतीनशे क्विंटलपर्यंत माल आला होता. माल विक्रीसाठी व्यापाऱ्यांशी बोलणी सुरू होती.

दोन दिवसांनी मालही व्यापारी नेणार होते; परंतु वादळीवाऱ्यासह पाऊस झाला. या पावसात पडलेल्या गारांमुळे वादळी वाऱ्यामुळे बागेचे नुकसान झाले. अडीच एकरातील बाग भुईसपाट झाली आणि उबाळे कुटुंबीयांचे 8 ते 10 लाखांचे नुकसान झाले. बाग कोसळल्याने शेतकरी फार मोठ्या संकटात सापडला आहे. कोसळलेली द्राक्ष बाग पाहून शेतकरी रडू लागले. कर्जाचा डोंगर फेडायचा कसा  वर्षभर लाखो रुपये खर्च करून बाग जोपासली होती. दोन दिवसात बागेतील माल व्यापारी नेणार होते. परंतु अवकाळी पाऊस, गारपीट झाली. यात बागेचं होत्याचं नव्हतं झालं. कर्ज काढून द्राक्ष लागवड केली होती. आता डोक्यावरील कर्जाचा डोंगर फेडायचा कसा आणि बाग पुन्हा उभी करायची कशी, असा प्रश्न समोर आहे. या नुकसानीची शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी गंगाधर उबाळे यांनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या