इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर धक्कादायक रिपोर्ट!
चंद्रकांत बनकर, प्रतिनिधी खेड (रत्नागिरी), 22 जुलै : रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळवाडी या ठिकाणी दरड कोसळून मोठी जीवितहानी झाल्यानंतर कोकणातल्या दरडग्रस्थ गावांचा सर्वे करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात दर्डप्रवण क्षेत्र असणाऱ्या गावांचा अहवाल नुकताच प्रशासनाने जाहीर केला. त्यामध्ये एकट्या खेड तालुक्यात 28 गावांमधील 44 वाड्या अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत. त्याठिकाणी या आधीदेखील दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे खेड तालुक्यातील शिरगाव हे चारही बाजूने डोंगराने वेढलेल्या संपूर्ण गावालाच दरडप्रवण क्षेत्र म्हणून शासनाने जाहीर केले आहे. या गावातील 8 वाड्यांना दरड कोसळण्याचा मोठा धोका असल्याने या गावातील लोक पावसाळ्यात अक्षरशः भीतीच्या छायेखाली जगात आहेत. एक दोन वाड्या नाही तर अख्खेच्या अख्खे गाव दरडीच्या छायेखाली असून प्रत्यक्ष या गावातून न्युज 18 लोकमतचा हा विशेष रिपोर्ट. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मधील संशयाद्रीच्या कुशीत वसलेले शिरगाव. या गावाला चारही बाजूने उंच उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढले आहे. गेल्या 4 वर्षांपासून या गावात सतत डोंगर खचून दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. या गावात आठ वाड्या आहेत. त्यामध्ये शिंदेवाडी, आंबेवनवाडी, लिंगायतवाडी, गंगेवाडी, विलासनगर, धनगरवाडी, रोहिदासवाडी, बौद्धवाडी, या वाड्यांचा समावेश आहे. या आठही वाड्या दरडीच्या छायेखाली आहेत, 2021 साली सात ते आठ ठिकाणी या गावाच्या डोंगर माथ्यावरून मोठ्या प्रमाणावर डोंगर खचून दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत, अनेक ठिकाणची शेती वाहून गेली आहे, अतिवृष्टीत अजूनही या ठिकाणी थोड्यापार प्रमाणात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच असते. त्यामुळे पावसाळ्यात या गावात दरड कोसळण्याच्या भीतीने लोक अक्षरशः रात्र जागून काढतात. वाचा - यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यात 45 जण अडकले, युद्धपातळीवर बचाव कार्य संपूर्ण कोकणात दरड कोसळण्याचा आणि जीवितहानी झाल्याच्या मोठ्या घटना रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात घडल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मधील पसरे-बौद्धवाडी आणि बिरमणी तर रायगड जिल्ह्यात तळिये आणि आता इर्शाळवाडी या दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन जीवितहानी झाली आहे, याच रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड या एका तालुक्यात 28 गावांमधील 44 वाड्या दरड कोसळण्याच्या धोकादायक स्थितीमध्ये आहेत. या सर्व गाव आणि वाड्यांना जिल्हा प्रशासनाने दरड प्रवण क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे, यामधील शिरगाव हे अख्खे गावच दरडप्रवण क्षेत्र म्हणून जाहीर केले गेले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मधील पोसरे, बिरमणी, त्यानंतर रायगड जिल्ह्यातील तळिये आणि आत्ता इर्शाळवाडी या दुर्घटनेनंतर कोकणातल्या दरड प्रवण क्षेत्रातील गावांचा सर्वे तर सुरु झालायय मात्र. एका खेड तालुक्यात शिरगाव या एका गावासह 28 गावांमधील 44 वाड्या दरडप्रवण क्षेत्रात मोडत असतील तर त्यांचे पुनर्वसन नेमके कुठे आणि कसे होणार याबाबत काहीतरी ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे, सध्यातरी या दरड प्रवण क्षेत्र असलेल्या गावांना केवळ कागदी नोटिसा देऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या जातायेत. मात्र, आपल्या गावातील घरदार, गुरे जनावरे, घेऊन नेमकं जायचं कुठे आणि खायचं काय असा प्रश्न येथील गावकऱ्यांना पडलाय.