हिंगोलीतील घटना
मनिष खरात, प्रतिनिधी हिंगोली, 27 जुलै : विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. हिंगोली जिल्ह्यात आज सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी ओढ्याला पूर आला आहे. वसमत तालुक्यातील शिरळी आश्रम शाळेजवळील ओढ्याला पूर आल्याने वाई-बोलडा हा मार्ग बंद झाल्याने अनेक गावांचा काही वेळ संपर्क तुटला होता. दरम्यान, पुलावरुन पाणी ओसंडत असताना त्यातून दुचाकी दुसऱ्याकडेना नेणे एकाला चांगलेच महागात पडलं आहे. ही घटना प्रत्यदर्शींनी किनाऱ्यावरुन आपल्या मोबाईलमध्ये कैद केली आहे.
काय आहे घटना? हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात दुपारनंतर झालेल्या पावसामुळे येलकी गावाजवळच्या ओढ्याला पूर आला होता. या पुलावरील पुराच्या पाण्यातून दुचाकी चालवत जाणे एका युवकाला चांगलेच महागात पडले आहे. पाण्याच्या प्रवाहामध्ये या युवकाची दुचाकी वाहून गेली आहे. सुदैवाने हा युवक मात्र सुखरूप आहे. यावेळी उपस्थित लोकांनी या युवकाला रोखले तरी त्याने पुराच्या पाण्यातून दुचाकी काढण्याचा प्रयत्न केला आणि ते त्याच्या चांगलच अंगलट आलं. यात चालक थोडक्यात बचावला. मंचक नगर येथील तरुणांनी चालकाला बाजूला केले. पूर ओसरळल्यानंतर दुचाकीही शोधून काढली. या ओढ्यावरील पुरामध्ये यापूर्वी एका तरुणाचा वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. आज तरुणांच्या सतर्कतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दुचाकी वाहून गेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वाचा - कल्याण-डोंबिवलीमध्ये तुफान पाऊस, रेल्वे ट्रॅक गेला पाण्याखाली, चाकरमानी लटकले VIDEO जिल्ह्यात पावसाची तुफान बॅटींग हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यामध्ये मंगळवारपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सेनगाव तालुक्यातील साखरा केलसुला हिवरखेडा उटी-ब्रह्मचारी धोतरा यासह इतर गावांमध्ये या जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे या भागातील नाले-ओढे तुडुंब भरून वाहत आहे. तर या पावसाचा फटका शेतीला सुद्धा बसणार आहे. शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे काही ठिकाणी शेतातील पिकांचं नुकसान झालं आहे. हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असून सद्यस्थितीत नद्या, नाले, ओढे भरुन वाहत आहेत. यामुळे नद्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.