मुंबई, 26 एप्रिल: महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून ऊन- पावसाचा खेळू सुरू झाला आहे. राज्यात काही ठिकाणी तापमानाचा पारा वाढल्याने उन्हाचे तीव्र चटके बसत आहेत. तर काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशातच आज उत्तर कोकणातील काही भाग वगळता उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता (Unseasonal rain alert) हवामान खात्यानं वर्तवली आहे. दरम्यान विदर्भात कमाल तापमानात (Teamperature in Maharashtra)वाढ झाली असून ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर याठिकाणी तापमानाचा पारा 43 अंशावर पोहोचला आहे. याचा सर्वाधिक धोका मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्ह्यांना अधिक आहे. त्यामुळे या भागात राहाणाऱ्या नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. काल महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. तर आज विदर्भातील काही जिल्हे अवकाळी पावसाच्या हिटलिस्टवर आहेत. पुढील चार-पाच दिवस विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यात पाऊस हजेरी लावणार असल्याची माहिती हवामान खात्यानं प्रसिद्ध केली आहे. आज विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यात कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे. असं असलं तरी चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. याठिकाणी आज विजांच्या गडगडासह एक-दोन ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर 28 आणि 29 एप्रिल रोजी भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. याठिकाणी मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे ही वाचा- मे महिन्याच्या सुरुवातीला दिवसाला 4 लाखांहून अधिक रुग्ण आढळणार, तज्ज्ञांचा दावा या व्यतिरिक्त मंगळवार आणि बुधवारी सिंधुदुर्ग, अहमदनगर, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि संपूर्ण मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. देशात सध्या अनेक ठिकाणी कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत. त्यामुळे दक्षिण भारतासह उत्तरेकडील काही राज्यांत अवकाळी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि तमिळनाडूची दक्षिण किनारपट्टी दरम्यान तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. राज्यातील दक्षिण भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.