JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / एकनाथ खडसे यांना EDची नोटीस, पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता

एकनाथ खडसे यांना EDची नोटीस, पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता

खडसे यांना 30 डिसेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आल्याची माहिती आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जळगाव, 25 डिसेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना EDकडून नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. खडसे यांना 30 डिसेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आल्याची माहिती आहे. ईडी नोटीसबाबत स्वत: एकनाथ खडसे यांना विचारलं असता ते म्हणाले की, ‘कदाचित सुट्टी असल्यामुळे मला अद्याप ईडीकडून नोटीस मिळालेली नाही.’ खडसे यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करतानाच आपली ईडीकडून चौकशी केली जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला होता. तसंच त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन, असा इशाराही दिला होता. त्यामुळे आता अखेर एकनाथ खडसे यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आल्यानंतर ते सीडी लावतात का आणि या सीडीतून कोणाचा भांडाफोड करतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ईडी आणि महाराष्ट्र राजकारण महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही ईडीकडून नोटीस आली होती. त्यानंतर शरद पवार यांनी आक्रमकपणे ईडी चौकशीचा सामना करत निवडणुकीपूर्वी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता अगदी काही दिवसांपूर्वीच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. त्यामुळे केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांविरोधात ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लावला जातो, असा आरोप विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी केला आहे. त्यातच आता एकनाथ खडसे यांनाही ईडीने नोटीस पाठवल्याची चर्चा सुरू झाल्याने आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहावं लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या