Mumbai: Shiv Sena President Uddhav Thackeray gestures after he was chosen as the nominee for Maharashtra chief minister's post by Shiv Sena-NCP-Congress alliance, during a meeting in Mumbai, Tuesday, Nov. 26, 2019. NCP chief Sharad Pawar and other leaders are also seen. (PTI Photo) (PTI11_26_2019_000222B)
अद्वैत मेहता, प्रतिनिधी पुणे, 02 डिसेंबर : महाविकास आघाडीच्या सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाच्या निर्णयांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. यात आता शासकीय नोकरभरतीत महापोर्टल हे डिजीटल व्यासपीठ मददगार न ठरता अडथळा ठरतं आहे. म्हणून ते बंद करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. राज्यातील संवाद दौऱ्यात ठिकठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यावर आमचं सरकार आलं की महापोर्टल बंद करू असं आश्वासन सुळे यांनी दिलं होतं. त्यामुळे आता मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मागील सरकारने शासकीय नोकर भरतीसाठी हे पोर्टल सुरू केलं होतं. पण यामध्ये पारदर्शकता नसल्याची तक्रार स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे हे पोर्टल बंद करण्यात यावं अशी मागणी पत्राद्वारे सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात 36 हजार सरकारी जागांसाठी मेगाभर्ती प्रक्रिया सुरू केली होती. सरकारच्या महा आयटी विभागाच्या महापरीक्षा पोर्टल माध्यमातून तलाठी पदासाठी 1809 जागांसाठी काही दिवसांपूर्वी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. याचा निकालही जाहीर झाला. या परीक्षेत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. 18 लाखांची बोली एक तलाठी पदासाठी लागली अशी चर्चा यावेळी होती. हे पोर्टल बंद व्हावं ही राज्यभरातील युवांची मागणी आहे. त्यामुळे ही सेवा तातडीने बंद करून पूर्वीप्रमाणे परीक्षा घेतल्या जाव्यात अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्यामुळे आता राज्याचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबद्दल काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, आरे कारशेडच्या बांधकामाला स्थगिती दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याच प्रकरणात आता दुसरा मोठा निर्णय घेतला आहे. आरे कारशेडविरुद्ध आंदोलन करणाऱ्यांविरुद्ध जे गुन्हे दाखल करण्यात आले होते ते सर्व गुन्हे मागे घेत असल्याची घोषणा त्यांनी रविवारी केली. आरे कार शेड मधील झाडं तोडताना पर्यावरण कार्यकर्त्यांनी वृक्ष तोडीला विरोध करत आंदोलन केलं होतं. यावेळी पोलिसांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून पर्यावरण कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. हेच गुन्हे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागे घेण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे पर्यावरण कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत कार शेडच्या बांधकामाला स्थगिती दिली होती. ते म्हणाले, मी दिलेला शब्द पाळणारा आहे. त्यामुळे आरे कार शेडच्या कामाला स्थगिती दिलीय. त्याचा आढावा घेतल्याशीवाय पुढे जाणार नाही. मी विकासाच्या विरोधात नाही. मात्र, अंधाधूंद कारभार चालणार नाही असंही त्यांनी सांगितलं. रातोरात झाडांची कत्तल झाली हे चालणार नाही. मी अनपेक्षीतपणे मुख्यमंत्रिपदावर आलो आहे. मी जबाबदारीपासून पळालो असतो तर शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून घ्यायला लायक ठरलो नसतो. ही जबाबदारी मोठी आहे कारण तीन पक्षांचं सरकार आहे. अजुनही मला मुख्यमंत्री झालो असं वाटतंच नाही. अजुनही मी विधानसभा आणि विधान परिषद पाहिली नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. बरं इतकंच नाही तर, टीका करताना अशी करा की त्याला त्याच्या चूका लक्षात आल्या पाहिजे. केवळ टीका करायची म्हणून टीका करू नका अशा शब्दात नव्या मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचे कान टोचले आहेत.