खोदकाम करताना सापडली धक्कादायक गोष्ट
सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 24 जून : वैजापूर तहसील कार्यालयाचे नवीन कार्यायीन इमारत बांधकामासाठी सुरू असलेल्या खोदकामात मानवी सांगाडा आढळून आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. तहसील कार्यालयाची इमारत ही निजामकालीन असून स्वातंत्र्याच्या पूर्वी या इमारतीचे बांधकाम झाले आहे. ही इमारत 130 वर्षाहून जुनी असून या सांगड्याची चर्चा सध्या तालुकाभरात सुरू आहे.
गेल्या महिन्यात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आमदार रमेश बोरनारे यांच्या उपस्थितीत या बांधकामाचे भूमिपूजन करून कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. याठिकाणी जुनाट जीर्ण निजामकालीन इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे. कंत्राटदाराने जेसीबीद्वारे खोदकाम सुरू केले होते. मात्र, गुरुवारी खोदकाम सुरू असताना तेथील मजुरांना जमिनीतून मानवी सांगाडा आढळून आल्यामुळे जेसीबी चालकाने खोदकाम बंद करुन या प्रकाराची माहिती बांधकाम उपविभागाचे सहाय्यक अभियंता काकड यांना दिली. मानवी सांगाडा आढळल्याची महिती सार्वजनिक बांधकाम विभागाने तहसील कार्यालयाला कळवली. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक शेख, विशाल पडळकर व अन्य पोलिसांनी भेट दिली. यासोबतच तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार कुलकर्णी आणि तलाठी पेहरकर यांनीही भेट दिली. या प्रकरणात पोलीस अधिक चौकशी करत आहेत. वाचा - रात्री अंगणात झोपले; सकाळी कोणाचे डोके फुटले तर कोणाचे.., बुलडाण्यात खळबळ सांगाड्याचे गूढ वैजापूर तहसील कार्यालयाची इमारत ही निजामकालीन आहे. अनेक वर्षे लोटून गेल्याने ती जीर्ण झाली होती. प्रत्येकवेळी डागजुजी करावी लागे. परिणामी या इमारतीच्या जागी नवीन इमारती उभारण्याच्या प्रस्ताव देण्यात आला. त्याअंतर्गत ही इमारत पाडून त्याच जागी नवीन इमारत बांधण्याचे ठरले. त्यानुसार मे महिन्यात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आमदार रमेश बोरनारे यांच्या उपस्थितीत या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. मात्र, खोदकाम करताना मानवी सांगाडा आढळल्याने काम थांबवण्यात आले आहे. स्वातंत्र्यापूर्वी या इमारतीचे बांधकाम झाले आहे. ही इमारत 130 वर्षाहून जुनी आहे. त्यामुळे हा सांगाडा किती जुना आहे? या सांगाड्याने नवीन इतिहास समोर येईल का? असे अनेक प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहेत. जोपर्यंत या सांगाड्याचा तपास होत नाही तोपर्यंत याचू गूढ कायम राहणार आहे.