तरुणाच्या प्रतापाने खळबळ
अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 16 जुलै : माहितीचा अधिकार माध्यमातून माहिती घेउन एखाद्या कामाची माहिती ज्ञात करण्याचा अधिकार सर्वसामान्यांना मिळाला. यामुळे कामातील पारदर्शकता वाढेल अशी अपेक्षा होती, मात्र असं म्हणतात ना की एखाद्या गोष्टीचा फायदा तसा गैरफायदा देखील घेतला जातो. तसाच काहीसा प्रकार सध्या उघड होत आहे. उद्योजकांनी ब्लॅकमेल होत असल्याच्या तक्रारी केल्या असताना, एका पठ्ठ्याने गंगापूर भुमी अभिलेख कार्यालयामध्ये एकाच माहितीसाठी 20 ते 25 अर्ज पोस्टाने कार्यालयामध्ये पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. माहिती अधिकाराचा वापर करून ब्लॅकमेलिंग केली जात असल्याच्या तक्रारी उद्योजकांपासून ते सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत करत आहेत. सतत काही ना काही कारणाने माहिती अधिकारातून माहिती मागायची आणि त्यातून आर्थिक लाभ कसा मिळेल यासाठी प्रयत्न करण्याचं काम काहीजण सर्रास करतात. जर पैसे मिळाले नाही तर समाज माध्यमांवर बदनामी करण्याचा इशारा देखील दिला जातो, त्यामुळे अनेक जण त्रस्त आहेत. त्यात गंगापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयात एका व्यक्तीने एकच माहिती मिळवण्यासाठी वीस ते पंचवीस अर्ज पोस्टाने कार्यालयात पाठवले आहेत. जर एकच माहिती पाहिजे तर त्यासाठी एक अर्ज पुरेसा आहे. मात्र, इतके अर्ज कशासाठी असा प्रश्न उपस्थित होतोय. तर यात हे सर्व फक्त आणि फक्त ब्लॅकमेलिंग साठी केलं जात आहे अशी भीती अधिकाऱ्यांनी खाजगीत बोलून दाखवली. वाचा - लॉटरीमुळे सापडला अट्टल गुन्हेगार; हत्येच्या आरोपात 7 वर्षांपासून होता फरार माहितीचा अधिकार म्हणजे सरकारकडून माहिती मागवण्याचे लोकांचे स्वातंत्र्य होय. भारतात ‘माहिती कायदा’ 11 मे 2005 मध्ये केंद्र सरकारने मंजूर केला. 12 ऑक्टोबर 2005 पासून हा कायदा अंमलात आला. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 19 प्रमाणे प्रत्येक व्यक्तीला भाषण आणि विचार स्वातंत्र्याचा हक्क आहे. काही महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगर औद्योगिक वसाहतीतील उद्योजक संघटनांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं, यामध्ये औद्योगिक क्षेत्रात काही लोक मुद्दाम माहिती अधिकाराचा गैरवापर करत माहिती मागण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या माध्यमातून खंडणी मागण्याचे प्रकार सर्रास केले जात आहे. यामुळे औद्योगिक विकासावर परिणाम होत असल्याचं, या पत्र्यात नमूद करण्यात आलं होतं. एकीकडे नवीन उद्योग येण्यास तयार नाही आणि दुसरीकडे आहे ते उद्योगांना अशा पद्धतीने त्रास दिला जातोय, मग उद्योग वाढणार कसा अशी खंत उद्योजकांनी बोलून दाखवली होती. मात्र ही बाब उद्योगांपर्यंत मर्यादित नाही तर सरकारी कार्यालयात देखील मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचं या निमित्ताने समोर आल. अधिकारी हैराण झाले आहे. या माहितीचा अधिकारांमध्ये कार्यालयाचे अधिकारी यांना जाणून बुजून काय त्रास देण्याचे काम एक व्यक्ती करत आहे. हा जाणून बुजून त्रास दिला जातोय अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे कायद्याचा उपयोगा ऐवजी गैरवापर सर्रास केला जात असल्याचं समोर येत असल्याने यावर तातडीने पाऊल उचलण्याची मागणी आता खाजगी आणि सरकार दरबारी केली जात आहे.