गोठ्यात शिरला बिबट्या, बकरीचा पाडला फडशा
सिद्धार्थ गोदाम, छ. संभाजीनगर, 29 जुलै: जंगलातील धोकादायक प्राण्यांचा वावर मानवी वस्तीकडे मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वन्य प्राण्यांची दहशत वाढत चालली आहे. अनेक ठिकाणांवरुन वाघ, बिबट्या, चित्ता गावात फिरतानाच्या घटना घडत आहेत. एवढंच नाही तर हे धोकादायक प्राणी घरात घुसून माणसांवर, पाळीव प्राण्यांवर हल्ला करत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे. आणखी एक घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. बिबट्यानं बकऱ्यांच्या गोठ्यात शिरून बकरीवर ताव मारला. यावेळी तेथील लोकांनी त्याला कोंडलं. ही घटना संभाजीनगरमधील गंगापूर येथून समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे.
बक-याच्या गोठ्यात शिरलेल्या बिबट्याने एका बकरीचा फडशा पाडुन ताव मारीत असताना शेतकऱ्यांनी गोठ्याचे दार बंद करून कुलुप ठोकल्यामुळे बिबट्याला बघण्यासाठी शेतकरी व नागरीकांनी मोठी गर्दी झाली.
शिंगी पिंपरी शिवारात आज रोजी रात्री अकरा वाजता बिबट्या घुसला. राऊसाहेब पवार यांच्या वस्तीवर कुत्र्याला धरले असता वस्तीवरील शेतकऱ्यांनी आरडा ओरड केल्यावर आवाजामुळे बिबट्या ओढ्याकडे पाळला. तो नरहरी राझंणगाव शिवारातील सुकदेव म्हस्के यांच्या शेतात बक-यासाठी बांधलेल्या जाळीच्या गोठ्यात घुसला. बक-याच्या आवाजाने म्हस्के बाहेर आले आणि त्यांना बिबट्या दिसला. त्यांनी लगेच गोठ्याचे दार बंद करून कुलुप ठोकून बिबट्याला बंद केलं. गोठ्यात 10 ते 15 बकऱ्या होत्या. त्यातील एका बकरीचा बिबट्याने फडशा पाडुन ताव मारायला सुरुवात केली. या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली असता त्यांनी आमच्या कडे बिबट्याला पकडण्यासाठी काहीच तयारी नसल्याचं सांगितलं.