संभाजीनगरमध्ये दोन कुत्र्यांना भर चौकात दिली फाशी
अविनाश कानडजे, छ. संभाजीनगर, 7 जुलै: गेल्या काही काळापासून फटक्या प्राण्यांची दहशत मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहे. विशेष करुन भटके कुत्रे, त्यांनी नागरिकांच्या मनात भितीच निर्माण केली आहे. भटके कुत्रे कधी कोणावर हल्ला करतील काही सांगू शकत नाही. आत्तापर्यंत बऱ्याच ठिकाणी चिमुकल्यांपासून वृद्धांपर्यंत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना समोर आल्या आहेत. नुकतीच अशीच एक घटना छत्रपती संभाजीगर याठिकाणहून समोर आली आहे. या घटनेनं सर्वत्र खळबळ उडवली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांचा चावा घेतला. या कुत्र्यांनी एक नव्हे तर पाच मुलांचा चावा घेतला तेही एका दिवसातच. त्यामुळे नागरीकांमध्ये संताप पहायला मिळत आहे. संतप्त नागरिकांनी मोठं पाऊल उचलत त्या दोन कुत्र्यांना फाशी दिली.
छत्रपती संभाजीनगरच्या संजय नगरमध्ये दोन कुत्र्यांना नागरिकांनी फाशी देऊन ठार केले आहे. या दोन कुत्र्यांनी एकाच दिवसात पाच लहानग्यांना चावा घेतला होता. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी हे कृत्य केलं. महत्त्वाचं म्हणजे या नागरिकांनी या कुत्र्यांबाबत महानगरपालिकेला वारंवार सूचना केल्या होत्या, तक्रारी केल्या होत्या.
या परिसरात मोकाट कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. मोठ्या संख्येने मोकाट कुत्रे आहे मात्र तरीसुद्धा महापालिकेने योग्य ती कारवाई केली नाही, असा नागरिकांचा आरोप आहे आणि त्यामुळे संतापलेल्या काही नागरिकांनी या कुत्र्यांना जाहीर फाशी दिली आहे.