मुंबई 13 मार्च : देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांनी आज कोरोनाविरोधात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोरोना लस (Corona Vaccine) घेतली. ही लस घेतल्यानंतर रतन टाटा म्हणाले, की लस घेताना मला थोडाही त्रास झाला नाही. ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय सोपी आहे. ते म्हणाले, मला आशा आहे, की देशातील प्रत्येक नागरिक कोरोनाची लस घेईल. लस घेतल्यानंतर रतन टाटा यांनी ट्वीटही केलं आहे. टाटा आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, आज मी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. यासाठी मी आभारी आहे. ही खूपच सोपी प्रक्रिया आहे आणि यात लस घेताना काही त्रासही होत नाही. मला आशा आहे, की प्रत्येक व्यक्तीला लवकरच ही लस दिली जाईल. रतन टाटा यांनी लस घेतल्यानंतर केलेल्या या ट्वीटनंतर आता देशात लसीकरणाच्या अभियानाला गती येईल, असं म्हटलं जात आहे. ८३ वर्षीय रतन टाटा यांनी या लसीबद्दल दिलेली माहिती ही त्यांच्या वयातील किंवा इतर सर्वांनाच लसीबद्दल विश्वास देणारी आहे. त्यामुळे, या गोष्टीचा नक्कीच फरक पडेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
अनेक ठिकाणी असं पाहायला आणि ऐकायला मिळत आहे, की कोरोना लस घेण्याबद्दल अजूनही अनेकांच्या मनामध्ये भीती आहे. या लसीच्या साईड इफेक्ट्सबद्दल अनेकांचे गैरसमजही आहेत. मात्र, रतन टाटा यांच्या या ट्वीटनंतर ही भीती काही प्रमाणात कमी होईल, हे मात्र नक्की. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील १ मार्चला दिल्लीतील एम्समध्ये कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यांनीदेखील लोकांना हा विश्वास देण्याचा प्रयत्न केला होता, की ही लस सुरक्षित आहे. पंतप्रधानांनीही अनेकदा नागरिकांना आवाहान केलं आहे, की कोरोना लसीकरणाच्या मोहिमेचा भाग बना आणि आपला नंबर येईल तेव्हा लस नक्की घ्या.