केसीआर यांचं मिशन महाराष्ट्र, पंकजांनंतर आणखी एका नेत्याला ऑफर
कोल्हापूर, 27 जून : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाने महाराष्ट्रामध्ये हात-पाय पसरायला सुरूवात केली आहे. मागच्या काही काळापासून बीआरएसमध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते सहभागी होताना दिसत आहेत. बीआरएसने आता थेट राजू शेट्टींनी मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे, मात्र या ऑफरला राजू शेट्टींनी साफ नकार दिलाय. बीआरसमध्ये पक्षप्रवेशाच्या अटीवर राजू शेट्टींनी ही ऑफर नारकाली आहे. गेल्या 4 महिन्यांपासून चंद्रशेखर राव हे आपल्या संपर्कात असल्याचंही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, राजू शेट्टींनी एकला चलोचा नारा दिला आहे. यासोबतच आमच्यातल्या काही जणांना बीआरएस फोडत असल्याचा आरोपही शेट्टींनी केली आहे. पंतप्रधान मोदींकडून सुप्रिया सुळेंचा उल्लेख, शरद पवारांचा पलटवार, म्हणाले… काय म्हणाले राजू शेट्टी? त्यांनी मला ऑफर दिली, बीआरएसमध्ये प्रवेश करा तुम्हाला केंद्रीय कोअर कमिटीचा सदस्य करतो. तसंच महाराष्ट्रात निवडणुका होतील तेव्हा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून तुम्हाला समोर आणू, असं त्यांनी सांगितलं. तुम्ही माझा इतका विचार केला याबद्दल धन्यवाद देतो, पण माझा कोणत्याही पक्षात जायचा विचार नाही, असं आपण त्यांना स्पष्टपणे सांगितल्याचं राजू शेट्टी म्हणाले. बीआरएसने राजू शेट्टी यांच्याआधी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही बीआरएसने पक्षात घेण्याची तसंच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनवण्याची ऑफर दिली होती. केसीआर महाराष्ट्रात भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएसचा महाराष्ट्रात विस्तार करण्याचा के. चंद्रशेखर राव यांचा प्रयत्न आहे. यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आपल्या मंत्रिमंडळासह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले. बीआरएसच्या विस्तारासाठी केसीआर यांनी महाराष्ट्राचा महासोहळा आषाढी यात्रेचा मुहूर्त निवडला. पंढरपुरात दर्शन घेतल्यानंतर केसीआर यांनी धाराशिवमध्ये जाऊन तुळजाभवानीचंही दर्शन घेतलं. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचं सोमवारी सोलापुरात आगमन झालं. त्यांच्यासोबत त्यांच्या अख्ख्या मंत्रिमंडळासह जवळपास तीनशे जणांचा ताफा होता. सोमवारी रात्रीचा त्यांचा मुक्काम सोलापुरात होता. मंगळवारी सकाळी केसीआर यांचा ताफा पंढरपूरच्या दिशेन रवाना झाला. पंढरपूरमध्ये दाखल होताच केसीआर यांनी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. तर केसीआर यांचे मंत्री, आमदार आणि खासदारांनी नामदेव पायरीचं दर्शन घेतलं. पंढरपुरात वारकऱ्यांची मोठी गर्दी असल्यामुळं मोजक्याच कोअर कमिटीच्या लोकांनी के चंद्रशेखर राव यांच्यासोबत मंदिरात सोडण्यात आलं होतं. केसीआर यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार देखील करण्यात आला.