मुंबई, 09 जानेवारी : कोकणामध्ये पुन्हा एकदा शिवसेना (Shivsena) आणि राणेपुत्रांमध्ये वाद पेटण्याची चिन्ह आहे. भाजपचे नेते नारायण राणे (Narayan rane) यांचे सुपूत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत फटके देण्याची धमकी दिली आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी व्हॅलेटाईंन डे निमित्ताने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना 7 नगरसेवकांची भेट दिली आहे. तर दुसरीकडे त्यांचे बंधू निलेश राणे यांनी शिवराळ भाषेत शिवसेनेच्या खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका केली आहे. विनायक राऊत यांनी ‘देवेंद्र फडणवीस यांच्या हट्टामुळे शिवसेना आणि भाजपची युती तुटली होती’, अशी टीका राऊत यांनी केली होती. त्यानंतर निलेश राणे यांनी व्हिडीओ ट्वीट करून शिवराळ भाषेत उत्तर दिले आहे.
‘विनायक राऊत हे खासदारकीच्या लायकीचे नाही. भाजपच्या लाटेत दोन वेळा ते निवडून आले आहे. हिंमत असेल तर त्यांनी आता राजीनामा द्यावा आणि निवडणूक लढवून दाखवावी’, असं आव्हानच राणेंनी दिलं. तसंच, ‘विनायक राऊत यांना दोन बायका आहे, त्यांच्यामध्ये खासदारकीच एकही गूण नाही, हा माणूस काय बोलतो त्याला कोणताही अर्थ नसतो, फक्त टीका करण्यासाठी त्याची ओळख आहे. मातोश्रीवरचा थापा गेला आहे, आता हा नवीन थापा असून तो चप्पला उचलायची काम करतो, अशी विखारी टीकाही निलेश राणेंनी केली. विनायक राऊत आता तुमची वेळ जवळ आलेली आहे. 2024 ला तुमचा बंदोबस्त करणार आणि कोकणातून कायमचे हद्दपार करणार आहे. जर भाषा बदलली नाहीतर जिथे दिसणार तिथे फटके दिले जाईल, अशी धमकीच निलेश राणेंनी दिली. तर दुसरीकडे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी नगरपंचायतमधील 7 राणे समर्थक नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल नितेश राणे यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘आमचे काही नगरसेवक हे शिवसेनेच्या वाटेवर आहे, याचे वृत्त वाचले. व्हॅलेंटाईन डे काही दिवसांवर आले आहे. शिवसेना हे आमचं जुनं प्रेम आहे. त्यामुळे जुने प्रेम विसरले नाही पाहिजे, असं म्हटलं जात असते. त्यामुळे आमच्याकडील 7 नगरसेवक तिकडे जात आहे.’
तसंच ‘वैभववाडी नगरपंचायतीमध्य शिवसेनेची अवस्था बिकट आहे. त्यांच्याकडे कोणताही नवा उमेदवार नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्यावर पहिल्यापासून प्रेम करतो. त्यांच्या पक्षाची अशी अवस्था होऊ नये म्हणून व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने सात नगरसेवक भेट म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवत आहोत, त्यांनी त्याचा स्वीकार करावा, असंही नितेश राणे म्हणाले.