JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'दाऊद फाऊद असतील, तुमच्याकडे राऊत तर आमच्याकडे...', जाता जाता कोश्यारींचा राऊतांना टोला

'दाऊद फाऊद असतील, तुमच्याकडे राऊत तर आमच्याकडे...', जाता जाता कोश्यारींचा राऊतांना टोला

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. राजीनामा स्वीकारल्यानंतर भगतसिंग कोश्यारी यांनी पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात हजेरी लावली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रमोद पाटील, प्रतिनिधी नवी मुंबई, 12 फेब्रुवारी : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. भगतसिंग कोश्यारी यांच्याजागी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजीनामा स्वीकारल्यानंतर भगतसिंग कोश्यारी पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात सहभागी झाले होते. नवी मुंबईतील उत्तराखंड प्रीमिअर लीगच्या कार्यक्रमात भगतसिंग कोश्यारी आले होते. यावेळी कोश्यारी यांनी भाषणात टोलेबाजी केली. ‘महाराष्ट्राचे लोक कसे आहेत? असं मला कुणीतरी विचारलं. मी म्हणालो ते आमच्या पहाडी लोकांसारखेच आहेत. चांगले लोक आहेत, शहरात असेल गुंडागर्जी, दादागिरी, दाऊद फाऊद असतील, पण ओव्हरऑल चांगली लोक आहेत. तुमच्याकडे देशपांडे आहेत, तर आमच्याकडे पांडे आहेत, तुमच्याकडे राऊत आहेत तर आमच्याकडे रावत आहे,’ असं म्हणत भगतसिंग कोश्यारी यांनी जाता जाता संजय राऊत यांना टोला लगावला. ‘काफल पिकायला लागलं असेल, एकदा जाऊन खाऊन या. काफल खायला मिळेल, म्हणून मीदेखील चाललो आहे,’ असंही कोश्यारी म्हणाले. उत्तराखंडच्या पहाडी भागामध्ये काफल हे फळ मिळतं, त्याबद्दलच कोश्यारी बोलत होते.

संबंधित बातम्या

भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने सुटका झाली आहे, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे. ‘भाजपने महाराष्ट्राची जेवढी बदनामी राज्यपालांकडून करवून घ्यायची होती, ती करवून घेण्याचं काम त्यांनी केलं. ते काम पूर्ण झालं, असं भाजपला वाटलं असेल म्हणून आता त्यांना त्या पदावरून हटवलं आहे. असा राज्यपाल भाजपने मुद्दाम बसवून ठेवला होता, महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी,’ अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यपालांच्या राजीनाम्यावरून कोश्यारी तसंच भाजपला टार्गेट करण्यात आलं आहे. ‘महाराष्ट्राच्या अस्मितेला ज्यांनी डाग लावला, ज्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला डिवचलं, अशा राज्यपालांना या भाजपने सतत पुढे चालू ठेवलं. राज्यपाल राष्ट्रपतींचे प्रतिनिधी असतात, त्यांनी देशाच्या संविधानाचं, घटनेचं संरक्षण करायला पाहिजे. आता इकडे असंविधानिक सरकार बसलं आहे, घटनाबाह्य सरकार बसलं आहे. हे सरकार बसवण्यात सुद्धा राज्यपालांचं फार मोठं योगदान आहे,’ अशी टीका खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या