प्रीतम मुंडेंचा सरकारला घरचा आहेर
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड, 31 मे : गेल्या काही दिवसांपासून भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीपटूंनी आंदोलन सुरू केलं आहे. राजधानी दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी 28 मे ला नवीन संसदेसमोर ‘महापंचायत’ आयोजित केली होती. मात्र, त्याआधीच पैलवान विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह अनेकांना पोलिसांनी फरफटत ताब्यात घेतले. या घटनेनंतर सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. मात्र, पहिल्यांदाच एखाद्या भाजप खासदाराने याविरोधात आवाज उठवला आहे. बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी यावरुन सरकारला घरचा आहेर दिला आहे. सरकारने खेळाडूंशी संवाद साधायला हवा होता : मुंडे देशभर गाजत असलेल्या महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या विषयात भाजपच्या बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी मोदी सरकारला घराचा आहेर दिला आहे. “या प्रकरणात खेळाडूंशी संवाद साधायला सरकारकडून कोणी गेले नाही, ही खेदाची बाब आहे. सरकारने खेळाडूंशी संवाद साधायला हवा होता”, अशी स्पष्ट भूमिका प्रितम मुंडे यांनी घेतली. बीड शहरात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. महिला खेळाडूंशी संबंधित प्रश्नावर बोलताना खासदार मुंडे यांनी ‘केवळ खासदारच नाही तर एक महिला म्हणूनही मला त्या महिला खेळाडूंबद्दल आस्था आहे. असे आरोप जेव्हा होतात, तेव्हा त्याची वेळेवर चौकशी व्हायला हवी होती, यातील सत्य समोर यायला हवे होते. सरकारकडून त्या महिला खेळाडूंशी संवाद साधायला कोणी गेले नाही. ते व्हायला हवे होते. त्या प्रकरणात योग्य ती कारवाई व्हायला हवी’ असे खा. मुंडे म्हणाल्या. एका भाजप खासदाराने अशी भूमिका घेतल्याने याची चर्चा होत आहे. वाचा - कुस्तीपटूंचा मुद्दा भारताबाहेर, UWW चा पाठिंबा, भारतीय कुस्ती महासंघावर बंदी घालण्याचा इशारा जागतिक कुस्ती महासंघाकडून दखल या घटनेची दखल आता थेट सर्वोच्च कुस्ती महासंघाने घेतली आहे. जागतिक कुस्ती महासंघाने मंगळवारी राजधानी दिल्लीत आंदोलनादरम्यान कुस्तीपटूंना ताब्यात घेतल्याचा निषेध केला. 45 दिवसात निवडणुका न घेतल्यास भारतीय कुस्ती महासंघाला बरखास्त करण्यात येईल, असा इशारा यावेळी दिला. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध कुस्तीपटूंच्या आंदोलनावर लक्ष ठेवून असल्याचे UWW ने सांगितले. “अनेक महिन्यांपासून, आम्ही भारतातील परिस्थितीबद्दल चिंतित असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.