जागतिक महिला दिन 2023 विशेष.
छत्रपती संभाजीनगर, 7 मार्च : आज महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आपला एक वेगळा ठसा निर्माण केला आहे. मराठवाड्यातही काही महिलांनी शेतीसारख्या क्षेत्रासाठी काम करत आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. उद्या 8 मार्चला जागतिक महिला दिवस आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊया, या महिलाशक्तीची प्रवास. मराठवाड्यातील महिलांनी स्थापन केली कंपनी - मराठवाड्यात प्रथमच फुलंब्री तालुक्यातील 14 खेडे गावातील 309 महिलांनी एकत्रित येऊन चक्क एक कंपनी स्थापन केली आहे. “अंजिता खोरे हुमन्स फार्मर’ असे या कंपनीचे नाव आहे. पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, औषधी उपलब्ध करून देणे आणि पिकवलेला शेतमाल खरेदी करून तो विक्री करणे, यासोबतच नवनवीन पीक पद्धतीत बदल करून कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी ही कंपनी काम करणार आहे. या माध्यमातून मधल्या दलालीला चाप बसेल आणि त्यामुळे नफा थेट शेतकऱ्यांना मिळण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कंपनीमध्ये या गावांतील महिलांचा सहभाग - मराठवाड्यातील वारेगाव, किनगाव, शिरोडी, डोंगरगाव, गणोरी, बोधेगाव, नरला, निढोना, मुर्शिदाबाद वाडी, चौका, बाभुळगाव तरटे, वाघोळा, सांजोळ, वानेगाव अशा एकूण 14 गावांतील तब्बल 309 शेतकरी महिलांनी एकत्र येत ही “अंजिता खोरे हुमन्स फार्मर’ ही कंपनी स्थापन केली. या 309 महिला या कंपनीच्या सभासद आहेत. दिल्ली येथे कंपनीची नोंदही केली आहे. अशी झाली कंपनीची नोंदणी - महाएफसीसीतर्फे कंपनी स्थापनेसाठी महिलांना मदत झाली आणि आयटीसी कंपनीचे मार्गदर्शन लाभले. दिल्लीच्या कार्यालयात 30 हजार रुपये शुल्क भरून रितसर कंपनीची नोंद करण्यात आली. केंद्राचे 10 हजार कंपन्या स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यात या महिला कंपनीचा समावेश आहे, असे कंपनीच्या अध्यक्षा पद्मा चव्हाण म्हणाल्या आहेत. महिलांच्या हितासाठी कंपनी काम करणार - तर पंचक्रोशीत लागवड ते विक्री व्यवस्थापनाचे पूर्वनियोजन केले जाईल. प्रोसेसिंग, ग्रेडिंग, पॅकिंग, ब्रँडिंग करून कंपनीमार्फत विक्रीसोबत गहू, फळ पिकांसाठी आयटीसी कंपनीचा व्हेंडर कोड घेतला. खते, बी बियाणे शेतकऱ्यांना देऊन त्यांचा शेतमाल खरेदी करू. महिलांच्या हितासाठी कंपनी काम करेल, असे कंपनीच्या सचिव वंदना बंडू जाधव म्हणाल्या. कंपनीचे भांडवल - दहा रुपये किंमतीचे प्रति सभासदाला 100 शेअर्स विक्री केले. 3 लाख 9 हजार रुपये कंपनीच्या नावे बँकेतही जमा केले आहेत. 10 मार्चनंतर पूर्ण क्षमतेत गव्हासह शेतमाल खरेदीला प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच चांदवड तालुक्यात ओझर खडक गावातील सेंद्रिय फळ शेतीची या महिलांनी नुकतीच प्रत्यक्ष पाहणी केली आहे. या शेतीच्या विकासासाठी कंपनीच्या वतीने प्रशिक्षणही देण्यात येत आहे. Success Story : अवघ्या 15 दिवसात मोडले या IRS चे लग्न, 3 भाषा शिकून झाली अधिकारी शेतकऱ्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यानंतर शेतात पीक येते. तर जे शेती करत नाहीत ती बाजारातील साखळी भाव ठरवते. आधारभूत किंमतीची अंमलबजावणी होत नाही. भाव पाडले जातात. यात सुधारणा करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लागू केलेल्या योजनेअंतर्गत महिलांनी एकत्रित येऊन बचत गट स्थापन केले. दुग्ध व्यवसाय, दुग्ध प्रक्रिया उद्योग, कुकुटपालन, शेळी पालन, अन्न प्रक्रिया उद्योग, आदी शेती पुरक व्यवसायाला प्राधान्य दिले. आता महिलांनी स्वत:ची कंपनी स्थापन केली आहे. मराठवाड्यातील या महिलांचे हे कार्य नक्कीच प्रेरणादायी आहे.