Demo Pic
सोलापूर, 4 एप्रिल : मुरूम चोरी करणाऱ्यांविरोधात फिर्याद दिल्याने आरोपींनी फिर्यादीवर कोयता, लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची घटना बार्शी तालुक्यातील (Barshi Taluka) जवळगाव येथे घडली आहे. फिर्यादी विष्णू कापसे आणि त्यांचे भाऊ दिलीप कापसे या दोघांना आरोपींनी जबरी मारहाण केल्याचा आरोप पीडित फिर्यादीने केला आहे. बार्शी तालुक्यातील जवळगाव 2 येथे हा सर्व प्रकार घडला. यात फिर्यादी विष्णू कापसे यांना डोक्याला आणि हाताला गंभीर इजा झाली असून त्यांना सोलापूरच्या (Solapur News) शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सकाळी 7 ते 8 च्या सुमारास फिर्यादी विष्णू कापसे आणि त्यांचा भाऊ जवळगावात आले असता आरोपींना त्यांना आरेरावी करत त्यांच्याभोवती घेराव घातला. आमच्याविरोधात गुन्हा दाखल का केला? आता तुला आम्ही जीवंत सोडत नाही, असं म्हणत गुन्हा दाखल असलेल्या आरोपींनी फिर्यादीला आणि त्याच्या भावाला बेदम मारहाण करायला सुरूवात केली. या मारहाणीवेळी आरोपींनी कोयता, लोखंडी रॉड तसेच काठीने बेदम मारहाण केल्याचा आरोप जखमी फिर्यादीने केला आहे. कशामुळे आरोपींनी फिर्यादीला केली मारहाण ? शासकीय जमीन, नैसर्गिक ओढे, नदी, नाले येथून विविध ठिकाणी गौण खनिजाचे बेकायदेशीर उत्खनन होते. म्हणजेच शासनाला कोणतीही रॉयल्टी न भरता दगड, माती, वाळू आणि मुरूम यांची अनेक ठिकाणी चोरी केली जाते. असाच मुरूम चोरीचा प्रकार बार्शी तालुक्यातील वैराग गावानजीक असलेल्या जवळगाव नं 2 या गावात सुरू होता. हेही वाचा - शारीरिक संबंधासाठी नकार दिल्यानं प्रेयसीची हत्या; इमारतीवरून पडल्याचा रचला बनाव जवळगाव नं 2 मधील शासकीय मालकीचे गायरान असलेल्या जमीन गट नं 194/1 मधील गायरान जमीन खोदून त्यातील सुमारे एक हजार ट्रॅक्टर ट्रॉली भरून म्हणजे अंदाजे 1200 ते 1300 ब्रास मुरूम विना नंबरच्या जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने जवळगाव नं 2 ते हत्तीज शिव रस्त्यावर बेकायदेशीरपणे आणि शासकीय परवानगीशिवाय आरोपींनी त्यांच्या स्वतःच्या शेतात खासगी रस्ता तयार करण्यासाठी वापरला. तसेच सदर बेकायदा मुरूम उपसा आणि वाहतुकीसाठी आरोपींनी हेतुपुरस्सर विनानंबरची ट्रॅक्टर ट्रॉली आणि जेसीबीचा वापर केल्याचा आरोप करत फिर्यादी विष्णू कापसे यांनी याबाबतची तक्रार गावकामगार तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, तसेच वैराग पोलीस ठाणे, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, गौण खनिज अधिकारी तसेच सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना दिली होती. परंतु, त्यांनी कोणतीही कारवाई नसल्याचा दावा फिर्यादी विष्णू कापसे यांनी केला. त्यामुळे अखेर विष्णू कापसे यांनी बार्शी येथील न्यायालयात धाव घेतली आणि मुरूम माफियांविरोधात खासगी फिर्याद दाखल केली. विशेष म्हणजे बार्शीच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन. एस. सबनीस यांनी कापसे यांच्या फिर्यादीची दखल घेत आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश वैराग पोलीस स्टेशनला दिले. दरम्यान, तक्रारदार विष्णू कापसे यांनी बार्शी न्यायालयात धाव घेतली आणि फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 156 (3) नुसार अर्ज दाखल केला. न्यायालयाने फिर्यादिच्या वकीलांचे म्हणणे ऐकून आरोपी परमेश्वर आंबरुषी ढेंगळे, अर्जुन बापू ढेंगळे, समाधान रावसाहेब ढेंगळे, रावसाहेब मच्छिंद्र ढेंगळे (सर्व राहणार जवळगाव नं 2 ता. बार्शी, जि. सोलापूर) यांच्याविरुध्द भा. द. वि. कलम 369, 452, 34, गौण खनिज अधिनियम 1957चे कलम 4, 21, पर्यावरण संरक्षण कायदा 1986 चे कलम 15 व प्रिव्हेन्शन ऑफ डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी ऍक्टचे कलम 3 व 4 नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश वैराग पोलिसांना दिले. त्यानंतर मात्र संतापलेल्या आरोपींनी आज सकाळी फिर्यादी विष्णू कापसे आणि त्याच्या भावावर जीवघेणा हल्ला केला. जखमी कापसे यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याबाबतचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या घटनेमुळे वैराग पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. याप्रकरणी सोलापूर ग्रामीण पोलीस प्रशासन अशा मुजोर माफियांवर काय कारवाई करणार, हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.