अलिबाग, 12 जानेवारी : अलिबाग समुद्रात एक धक्कादायक घटना घडली आहे. अलिबागमधील कोळीवाड्यातील काही खलाशी मासेमारी करण्यासाठी बोटीने खोल समुद्रात गेले होते. या दरम्यान अचानक बोट बुडाल्याची माहिती समोर आली आहे. याबोटीत तीन खलाशी असल्याची माहित आहे. यातील दोघांना वाचवण्यात यश आले आहे तर एकजण अद्यापही बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याची माहिती देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग कोळीवाड्यातील नाखवा इंद्रजित खमीस, नाखवा यांची 45 ते 50 फूट मोठी बोट मध्यरात्री समुद्रात बुडाली. मासेमारी करण्यासाठी ही बोट गेली होती. अलीबागच्या कुलाबा किल्ल्यापासून 20 मिनिट अंतरावर बोट बुडाल्याने याच बोटीच्या शेजारी दुसऱ्या मासेमारी करणाऱ्या बोटीतील खलाशानी दोघांना वाचवले, तर एकजण अद्याप बेपत्ता असून शोध मोहीम सुरू आहे.
हे ही वाचा : सापाला मारल्याच्या गुन्ह्यात तरुण फरार; पोलिसांनी सापाचं पोस्टमार्टम केलं अन्…
रत्नागिरीतही अशीच परिस्थिती
मासेमारीसाठी गेलेल्या गुजरातमधील बोटीला रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावर जलसमाधी मिळाल्याची घटना उघडकीस आली आहे. रत्नागिरीतील मिरकवाडा बंदराजवळ ही घटना घडली. बोटीत एकूण सात खलाशी होते. यापैकी चौघांना वाचवण्यात यश आले आहे. तिघे बुडाले असून दोघांचे मृतदेह सापडले. तर एक जण अद्याप बेपत्ता असून, त्याचा शोध सुरु आहे. लक्ष्मण भिखार वळवी आणि सुरेश भिखार वळवी अशी मयत खलाशांची नावे आहेत. तर मधुकर चैत्या खटाल असे बेपत्ता खलाशाचे नाव आहे.
गुजरात येथील रत्नसागर, गदाधर, कुणेश्वरी 2, कपीध्वज या चार मासेमारी नौका समुद्रात मासेमारी करीत होत्या. रत्नागिरीहून पुन्हा तलासरीच्या दिशेने जात असताना रत्नागिरीतील मिरकवडा येथे समुद्र खवळल्याने या खलाशी बोटी घेऊन तेथेच थांबले होते.
हे ही वाचा : विमानातील जेवणात प्रवाशाला आढळली भलतीच वस्तू, संतापताच कंपनीने दिलं हे उत्तर….
यापैकी रत्नसागर बोटीतील मध्यभागातील फळीचा खिळा लाटांच्या माऱ्यामुळे निखळला आणि बोटीत पाणी शिरले. यावेळी बोटीच्या डेकवर बसलेल्या खलाशांनी आरडाओरडा केला. मात्र बोटीतील सर्वजण बाहेर पडण्याआधीच बोट पाण्यात उलटली.