प्रियांका बोबडे, प्रतिनिधी अहमदनगर, 13 मार्च: शालेय मुलांना सर्वांगिण शिक्षण देण्याची गरज असते. त्यातच ग्रामीण भागातील बहुतांश मुले ही शेतकरी कुटुंबातील असतात. या मुलांना शाळेतही आधुनिक शेतीचे धडे मिळावेत यासाठी प्रयत्न केले जातात. महाराष्ट्रातील काही आदर्श शाळांनी हा उपक्रम चांगल्या पद्धतीने राबविला असून त्याचा विद्यार्थ्यांना दुहेरी फायदा होत आहे. याच उपक्रमातून अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात एका वसतीशाळेतील विद्यार्थ्यांनी खडकाळ जमिनीवर परसबाग फुलवली आहे. लहूचा मळा उपक्रमशील शाळा संगमनेर तालुक्यात नांदूर खंदरमाळ येथील लहूचा मळा येथील जिल्हा परिषद शाळा उपक्रमशिल शाळा म्हणून ओळखली जाते. या शाळेतील विद्यार्थ्यांनी खडकाळ जमिनीवर परसबाग फुलवली आहे. शाळेतील परसबागेत उत्पादित होणाऱ्या सेंद्रिय भाजीपाल्याचा वापर विद्यार्थ्यांच्या रोजच्या आहारात होतो. त्यामुळे जेवण रुचकर बनत आहे. तसेच या प्रयोगाने विद्यार्थ्यांना शेतीची आवड निर्माण झाली आहे.
परसबाग उपक्रमात जिल्ह्यात द्वितीय जिल्हा परिषदेच्या पंतप्रधान पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये परसबाग तयार कण्याचा उपक्रम घेण्यात आला. प्रथमतः केंद्रस्तर, तालुकास्तर आणि नंतर जिल्हास्तरावर हा उपक्रम झाला. नांदूर खंदरमाळ गावांतर्गत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहूचा मळा या शाळेने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. तर जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक मिळवला. Learn With Fun : सांगलीतील शाळेनं राबवला भन्नाट उपक्रम, मुलांनी हसत-खेळत घेतलं शिक्षण! Photos शिक्षक दाम्पत्याला ग्रामस्थांचे सहकार्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लहूचा मळा येथे मुख्याध्यापक रोहिदास गाडेकर, उपशिक्षिका आशा गाडेकर हे गत चार वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांनी ग्रामस्थांची मदत घेत स्वतःची कल्पकता आणि इच्छाशक्तीतून शाळेचा कायापालट केला. शाळा खडकाळ जागेत असल्याने गाडेकर दाम्पत्याच्या संकल्पनेतून परसबागेचे नियोजन करण्यात आले. परिसरात मातीचा भराव करून गेटच्या आत वर्गासमोर परसबाग तयार करण्यात आली. त्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य मिळाले. परसबागेत विविध भाज्या वाफे तयार करत कांदा, लसूण, बटाटा, मुळा, टोमॅटो, फ्लॉवर, कोथिंबीर, मिरची आदी पिकांची लागवड केली. विद्यार्थी स्वतःहून सहभागी झाले. ठिबक सिंचनाने पाणी दिले जाते. परसबागेत पाण्याचा कमी प्रमाणात वापर केला जातो. तसेच कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल, असे नियोजन केले आहे. Unique School : या शाळेत राहणे-खाणे सर्व Free, फक्त 14 दिवसात शिका अस्खलित संस्कृत मुलांचा सर्वांगिण विकास विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच श्रमप्रतिष्ठेचे मूल्य रुजविण्यासाठी शाळेत परसबाग ही संकल्पना राबविण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना शेतीविषयक गोडी निर्माण झाली. विद्यार्थ्यांना सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला भाजीपाला आहारात मिळतो आहे. लहूचा मळा या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वर्षभर अनेक नावीन्य पूर्ण उपक्रम राबवले जातात. यातून मुलांचा सर्वांगीण विकास होत आहे.