राधाकृष्ण विखेंनी मारलं मैदान
अहमदनगर, 30 एप्रिल : सध्या राज्यभरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राहाता बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपच्या सर्वच उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. राहाता बाजार समितीच्या 18 जागांपैकी 15 जागांसाठी निवडणूक पार पडली. तर यापूर्वीच भाजपच्या 3 जागा बिनविरोध झाल्या होत्या. आता उर्वरीत निकाल समोर आला असून सर्वच जागांवर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. थोरात गटाचा धुव्वा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची या राहाता बाजार समितीच्या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, बाळासाहेब थोरांतांनी प्रतिष्ठा पणाला लावूनही राधाकृष्ण विखे पाटलांनी राहाता एक हाती राखलं आहे. या निवडणुकीत थोरात गटाचा धुव्वा असून त्यांना भोपळाही फोडता आला नाही. नगरमध्ये थोरातच जोरात! अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे आजी माजी महसूलमंत्र्यांच्या पॅनलमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली. संगमनेर बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांच्या शेतकरी विकास पॅनलने 18 पैकी 18 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा पॅनलचा पराभव केला आहे. तसेच राहुरी बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पॅनलने विखे-कर्डिले युतीच्या पॅनलला धक्का देत 18 पैकी 16 जागा जिंकत बाजार समितीवर सत्ता राखली आहे. वाचा - नाना पटोलेंना शह देण्यासाठी भाजपची राष्ट्रवादीसोबत युती; पण अखेर काँग्रेसने सत्ता राखली संगमनेर बाजार समितीवर गेल्या 30 वर्षांपासून बाळासाहेब थोरात गटाची बिनविरोध सत्ता आहे, मात्र यंदा विखे पाटलांच्या पॅनलने आव्हान दिल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मात्र, या निवडणुकीत थोरातांनी सत्ता राखली असून विखे पाटलांचे खातेही उघडले नाही. सर्व 18 जागा थोरात गटाने मिळवल्या असून प्रतिष्ठेच्या लढतीत थोरातांची सरशी दिसून आली. विखे पाटलांच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला. विजयानंतर संगमनेरात थोरातांच्या कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष साजरा केला. तसेच राहुरी बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांच्या जनसेवा मंडळाला 18 पैकी 16 जागा मिळाल्या असून भाजपच्या विखे कर्डिले युतीच्या विकास मंडळाला फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. बाजार समितीच्या या निवडणुकीत विषय गटाला मोठा धक्का बसला असून महाविकास आघाडीची सरशी दिसून आली.