सांगली, 17 ऑक्टोबर: सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील आळसंद येथे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. याठिकाणी एकाच मण्यार या अतिविषारी सापाने दोन वेगवेगळ्या दिवशी बहीण-भावाला दंश (manyar snake bite brother and sister ) केला आहे. 6 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री झोपेत असताना, मण्यार सापाने दंश केल्याने भावाचा मृत्यू झाला होता. भावाच्या अंत्यविधीसाठी आलेल्या विवाहित बहिणीला देखील दुसऱ्या दिवशी रात्री त्याच मण्यार सापाने दंश केला होता. गेल्या आठ दिवसांपासून बहिणीवर सांगलीतील रुग्णालयात उपचार सुरू होता. मात्र बहिणीची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. भावानंतर बहिणीचा देखील दुर्दैवी अंत झाला आहे. एकाच कुटुंबातील सख्खा बहीण भावाचा अशाप्रकारे अंत झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. हेही वाचा- प्रेयसीने बोलावलं म्हणून तो रात्रीचं निघाला; दुसऱ्या दिवशी विहिरीत दिसला मृतदेह नेमकं काय घडलं? खानापूर तालुक्यातील आळसंद येथे सुनिल कदम यांचं कुटुंब वस्तीवर वास्तव्याला आहे. दरम्यान, 6 ऑक्टोबर रोजी घरातील सर्वजण गाढ झोपले असताना, सुनील कदम यांचा 16 वर्षीय मुलगा विराज याला मण्यार सापाने दंश केला होता. मध्य रात्री झोपेत असताना मण्यारने दंश केल्याने, नेमकं काय झालंय? हेही त्याला कळत नव्हतं. पण पहाट होईपर्यंत त्याचा त्रास वाढला आणि सकाळी त्याचा मृत्यू झाला. विराजच्या मृत्यूनंतर त्याची विवाहित बहीण सायली वृषभ जाधव (वय-22) अंत्यविधीसाठी माहेरी आली होती. भावाच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी रात्री बहीण घरात झोपली असताना, घरात लपून बसलेल्या मण्यार सापाने सायलीला दंश केला. हेही वाचा- दुर्गा पूजेसाठी कलकत्त्याला फिरायला गेलं होतं कुटुंब; घरी परतल्यावर बसला धक्का सापाने दंश करताच सायलीनं आपल्या आईला उठवलं, तेवढ्यात मण्यार साप सळकण निघून गेला. यानंतर कुटुंबीयांनी तातडीने सायलीला विटा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्यानंतर पुढील उपचारासाठी सायलीला सांगली येथे हलवण्यात आलं. याठिकाणी गेल्या आठ दिवसांपासून सायलीवर उपचार सुरू होते. पण गेल्या दोन दिवसांपासून सायलीची प्रकृती अचानक बिघडली आणि यातच तिने अखेरचा श्वास घेतला आहे. भावापाठोपाठ बहिणीचाही दुर्दैवी अंत झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.