मुंबई, 08 नोव्हेंबर : कन्याकुमारीपासून सुरू झालेल्या काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ 61 व्या दिवशी महाराष्ट्रात पोहोचली आहे. भारत जोडो यात्रेला मिळणार प्रतिसाद पाहता राज्यातील भाजप विरोधी घटक पक्षही राहुल गांधी यांच्या यात्रेला उपस्थिती दर्शवत आहेत. यामुळे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे राहुल गांधी यांच्यासोबत दिसणार आहे. ते भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याने सगळ्यांच्या नजरा आदित्य ठाकरेंकडे सामिल होणार का याकडे लागल्या आहेत.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा काल( दि. 07) सोमवारी संध्याकाळी तेलंगणातील मेनुरू गावातून महाराष्ट्रात दाखल झाली. तेलंगणा काँग्रेसचे प्रमुख रेवंत रेड्डी हे दोन्ही राज्यांच्या सीमेवर महाराष्ट्राचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे तिरंगा सुपूर्द करत महाराष्ट्रात स्वागत केले. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्याऐवजी आदित्य ठाकरे राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी होणार आहेत. 11 तारखेला नांदेड येथे होणाऱ्या सभेला आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
हे ही वाचा : जितेंद्र आव्हाडांच्या आंदोलनाला मनसेचं ‘हाऊसफूल’ प्रत्युत्तर, ठाण्यात ‘हर हर महादेव’ला तुफान गर्दी
युवा सेना नेते आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. येणाऱ्या 11 तारखेला ते नांदेड येथे होणाऱ्या सभेला हजेरी लावणार असून यावेळी राहुल गांधींची ते भेट घेणार आहेत. अदित्य ठाकरे हे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बीडच्या गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी येथे शेताच्या बांधावर जाऊन पहाणी केलीय. यादरम्यान त्यांनी मीडियाशी बोलतांना ही माहिती दिलीय.
राहुल गांधी 14 दिवस महाराष्ट्रात
आपल्या 14 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष 15 विधानसभा आणि सहा लोकसभा मतदारसंघातून 381 किमी चालणार आहेत. यादरम्यान ते दररोज 22 ते 23 किमी चालणार असून 20 नोव्हेंबरच्या संध्याकाळी मध्य प्रदेशात प्रवेश करण्यापूर्वी नांदेड, हिंगोली, वाशिम आणि अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातून जाणार आहेत. 3,570 किमी आणि 150 दिवसांची ही पदयात्रा 7 सप्टेंबर रोजी तामिळनाडूमधील कन्याकुमारी येथून सुरू झाली आणि जम्मू-काश्मीरमध्ये संपणार आहे.
हे ही वाचा : अब्दुल सत्तारांचं वादग्रस्त वक्तव्य, मग माफी, सुप्रिया सुळेंनी दिली पहिली प्रतिक्रिया
भारतातील दक्षिणेकडील राज्यांतून दोन महिन्यांनी राहुल गांधींचा पदयात्रा महाराष्ट्रात पोहोचली आहे. तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून भारताच्या दक्षिण-पूर्व भागातून 7 सप्टेंबर रोजी सुरू झालेली ही यात्रा आता पश्चिम द्वीपकल्पीय प्रदेशात पोहोचली आहे. तेलंगणामध्ये, राहुल गांधीं यांनी अनेक समुदाय नेते, खेळाडू, व्यापारी आणि मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद साधला. महाराष्ट्रात काही सभा घेण्याचा त्यांचा कार्यक्रम आहे, त्यातील एक नांदेड जिल्ह्यात आदित्य ठाकरे सामिल होणार आहेत.