मुंबई, 12 एप्रिल: राज्यातील कोरोनाची स्थिती गंभीर झाल्याने अखेर राज्य सरकारने दहावी आणि बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. ‘सध्याची परिस्थिती परीक्षा घेण्यासाठी योग्य नाही. त्यामुळे तुमचं आरोग्य हे आमचं प्राधान्य असल्याने या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात येत आहे’, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वर्षा गायकवाड यांची आज दहावी आणि बारावी परीक्षेच्या संदर्भात बैठक झाली. या बैठकीत सध्या नियोजित वेळापत्रक बदल करावा असा सूर लावण्यात आला. त्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारकडून आगामी काळात अधिकृतरित्या परीक्षेचं नवीन वेळापत्रक जाहीर केले जाईल, अशी माहिती आहे.
काँग्रेसच्या नाना पटोले यांनीही केली होती मागणी ‘कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. राज्यात दररोज 50 हजारांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण होत आहे. शहर व ग्रामीण भागातही कोरोनाचे संक्रमण वाढलेले दिसत आहे. अशा गंभीर परिस्थितीत परीक्षा घेणे हे लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ केल्यासारखे होईल. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात,’ अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती.