अमेरिका,1 फेब्रुवारी: बाळांच्या निरागस हास्यासारखी (Baby’s Smile) दुसरी सुंदर गोष्ट जगात असेल असं वाटत नाही. अशाच एका गोड हसण्यानं सध्या जगाला वेड लावलंय. सोशल मीडियावर बाबाच्या कुशीत बसून गोड हसणाऱ्या एका पाच सहा महिन्यांच्या मुलीचा व्हिडिओ अतिशय लोकप्रिय झाला आहे. अवघ्या काही तासातच या व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओत एक गोंडस बाळ (Baby Girl) बाबाच्या कुशीत पहुडलं असून, गोष्टीचं पुस्तक (Story Book) वाचून दाखवत आहे. मिकी माऊसच्या गोष्टीचं (mickey Mouse Story) हे पुस्तक आहे, यातील मिकी माऊस, गुफी, मिनी माऊस आदी पात्रांनुसार (Characters) तो वेगवेगळे आवाज काढत आहे. ते ऐकून ही चिमुकली जणू सगळं कळत असल्यासारखं गोड हसत आहे. वेगळा आवाज काढला की ती आपलं मोठं बोळकं पसरून हसत आहे. आवाज करते आहे. तिचं हे प्रतिसाद देणं, हसणं इतकं गोड, निरागस आहे की, हे दृश्य बघणारा प्रत्येक जण त्यात हरवून जात आहे. प्रेमळ बाबा आणि त्याची ती गोंडस छकुली बघून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू फुलत आहे, सगळा ताण, दुःख विसरून मन प्रसन्न होत आहे. त्यामुळं अवघ्या काही तासात हा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगानं सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अमेरिकेतील बास्केटबॉल प्लेयर रेक्स चॅपमॅन (Rex Chapman) यानं ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ही बेबी गर्ल वेगवेगळ्या आवाजात गोष्ट वाचून दाखवणाऱ्या बाबाला बघून गोड हसत आहे. आज मला याचीच गरज होती… अशी कॅप्शन त्यानं दिली आहे. हा व्हिडिओ पोस्ट केल्याक्षणापासून वायुवेगाने व्हायरल होत असून, अवघ्या काही तासात त्याला तब्बल 467.8 हजार व्ह्यूज असतात. ट्विटरवर (Tweeter) 33.2 हजार लाईक्स मिळाले असून, 5.1 हजार रीट्वीटस झाले आहेत.
हा व्हिडिओ बघून भावूक झालेल्या नेटकऱ्यांनी (Netizens) या बापलेकीच्या जोडीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. एका महिलेनं म्हटलं आहे, माझं ह्रदय पाघळतंय हे बघून असं म्हटलं आहे, तर एकीनं ही मुलगी धमाल उडवणार आहे, अशी कमेंट केली आहे. माझे वडीलही आम्ही लहान असताना असेच गोष्ट सांगायचे असं एका मुलीनं म्हटलं आहे.
हा बाबा आणि ही मुलगी मला खूप आवडले आहेत, असं एकानं म्हटलं आहे, तर एका मुलीनं मी दिवसभर हा व्हिडिओ बघू शकते असं ट्विट केलं आहे. अतिशय गोड, सुंदर दृश्य आहे अशी कमेंट एकानं केली आहे, तर हे बघून जुन्या काळात आठवणीत गेल्याचं एकीनं म्हटलं आहे.
एकीनं जी जगातील सर्वात सुंदर गोष्ट असल्याचं म्हटलं आहे, तर एकीनं हे बघून आपल्या डोळ्यात पाणी आल्याचं सांगत एक चांगला पुरुष चांगला बाप होऊ शकतो. अशा छोट्या छोट्या गोष्टी कायम स्मरणात राहतात असं म्हटलं आहे. बाप-लेकीच्या जिव्हाळ्याचं दर्शन घडविणारं हे दृश्य सगळ्यांच्या मनात कायम कोरलं गेलं आहे हे निश्चित!