मुंबई, 11 मार्च : केसांच्या (Hair) आरोग्यासाठी विविध उत्पादनांचा वापर करणं ही सामान्य बाब आहे. पारंपरिक पद्धतीनं केसांची निगा राखणं हे आता जवळपास दुर्मीळ झालं आहे. आता प्रत्येक जण शॉर्टकट पद्धतीने केसांसाठी शाम्पू, कंडिशनर वापरतो आणि यातून केसांचं पोषण होतं असा गैरसमजही करून घेतो; पण ही उत्पादनं आपल्या शरीरासाठी (Body) कशी अपायकारक ठरतात, हे नुकत्याच आलेल्या एका संशोधन अहवालातून स्पष्ट झालं आहे. आपले केस मजबूत आणि चमकदार बनवण्याच्या नादात आपण आपलं शरीर आतून कमकुवत करत आहोत का, असा विचार याआधी कोणच्याही मनात आला नसेल. `द सन`च्या वृत्तानुसार, केसांसाठी लोकप्रिय उत्पादन असलेल्या ओलाप्लेक्सच्या (Olaplex) काही उत्पादनांमध्ये मनुष्याच्या प्रजनन क्षमतेवर (Fertility) थेट हल्ला करणारा एक घटक आढळून आला आहे. त्यामुळे केसांसाठी या उत्पादनांचा वापर कमी केला नाही, तर गंभीर परिणाम होऊ शकतात, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. हे वाचा - फेअरनेस क्रिममध्ये होतोय या घातक घटकाचा अतिवापर; खरेदी करताना तपासा या गोष्टी प्रामुख्याने सेलेब्रिटी (Celebrity) वापरत असलेल्या ओलाप्लेक्स या लोकप्रिय हेयर ब्रँडबाबत असा दावा करण्यात आला आहे, की यात ब्युटाइलफिनाइल मिथाइल-प्रोपियोनलचा वापर केला जात असून, हे घटक शरीराच्या प्रजजनावर थेट परिणाम करतात आणि याचा प्रमाणापेक्षा अधिक वापर करणं शरीरासाठी घातक ठरू शकतं. या कारणामुळे युरोपियन युनियनमध्ये (European Union) सौंदर्य प्रसाधनांमध्ये (Cosmetics) ब्युटाइलफिनाइल मिथाइल-प्रोपियोनलचा वापर करण्यास पूर्णपणे बंदी आहे. `कोणत्याही प्रॉडक्टची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय आम्ही याचा वापर किंवा प्रचार करणार नाही,` असं हे हेअर प्रॉडक्ट वापरत असलेल्या सेलेब्रिटीजनी सांगितलं आहे. अल्पावधीतच ठरला मोठा ब्रँड; आता युझर्स आहेत चिंतेत ओलाप्लेक्समध्ये घातक घटक मिसळले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचा वापर करणारे चिंताग्रस्त झाले आहेत. प्रत्येक जण याच्या वापरामुळे होणाऱ्या नुकसानाबाबत जागरूक होण्यासोबतच त्याची आधिक माहिती जमा करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे उत्पादन गर्भवती (Pregnant) महिलांसाठीही प्रतिकूल ठरू शकतं. मिळालेल्या माहितीनुसार, या उत्पादनात गर्भातल्या भ्रूणावरही प्रतिकूल परिणाम करण्याची क्षमता असल्याने चिंता अधिक वाढली आहे. हे वाचा - झटक्यात वेगवेगळे रंंग ओळखतात बायका! पुरुषांच्या तुलनेत रंगज्ञान जास्त का? 2014मध्ये लॉंच झाल्यानंतर ओलाप्लेक्स हेअर प्रॉडक्ट कोरड्या आणि तुटलेल्या केसांच्या समस्येसाठी फायदेशीर ठरणारा एक मोठा ब्रँड बनला. ओलाप्लेक्सच्या सिग्नेचर बॉटल्स, नंबर 1 बाँड मल्टिप्लायर आणि नंबर 2 बाँड परफेक्टर आणि पेटंटेड सिंगल अॅक्टिव्ह इनग्रेडियंट या कारणांमुळे खूप लोकप्रिय आहेत; मात्र केसांचं आरोग्य सुधारत असलं तरी यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करून नक्कीच चालणार नाही.