मुंबई 21 जानेवारी : 26 जानेवारी 1950 रोजी भारताने राज्यघटनेचा स्वीकार केला होता. तेव्हापासून दर वर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. या वर्षी भारत आपला 74वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. हा दिवस भारतासाठी खूप खास आहे आणि म्हणूनच दर वर्षी 26 जानेवारी हा राष्ट्रीय सुट्टीचा दिवस असतो. प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध शाळा, शासकीय कार्यालयं, संस्था आणि सोसायट्यांमध्ये विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. यामध्ये गायन आणि नृत्याव्यतिरिक्त मुलं भाषणदेखील देतात. तुम्हीही प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण करण्याची तयारी करत असाल, तर त्यासाठी उपयुक्त अशा काही टिप्स या ठिकाणी दिल्या आहेत. त्या टिप्स वापरून तुम्ही भाषणाची तयारी केल्यास सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र ठरू शकता. तुमच्या भाषणाचं होईल कौतुक प्रजासत्ताक दिनी भाषण करणारा प्रत्येक विद्यार्थी एकदम चोख तयारी करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येकाला भाषणाच्या माध्यमातून श्रोत्यांना आश्चर्यचकित करायचं असतं आणि टाळ्या मिळवायच्या असतात. तुमचीही अशीच इच्छा असेल तर प्रजासत्ताक दिनाचं भाषण तयार करण्यासाठी काही सोप्या टिप्स जाणून घ्या. 1. भाषण करण्यापूर्वी किमान एक दिवस चांगली तयारी करा. असं केल्यानं, भाषण करताना तुमचा सूर एकसारखा असेल आणि तुम्ही कोणताही मुद्दा विसरणार नाही. घरातल्या वडिलधार्यांसमोर तुम्ही भाषणाचा सराव करू शकता. 2. प्रजासत्ताक दिनाशी संबंधित सर्व बाबी माहिती करून घ्या. कागदावर संपूर्ण भाषण लिहून एक आराखडा तयार करा. असं केल्यानं तुम्ही महत्त्वाची माहिती विसरणार नाही आणि तुमचा प्रेक्षकांवरही चांगला प्रभाव पडेल. 3. भाषणाच्या सुरुवातीला, तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना अभिवादन करण्याचं नेहमी लक्षात ठेवा. Republic Day 2023 : बैठकीच्या पहिल्या रांगेत रिक्षाचालक, भाजी विक्रेत्यांना मान 4. अभिवादन केल्यानंतर आपला परिचय द्या आणि त्यानंतरच भाषण सुरू करा. 5. भाषण सोप्या आणि बोलीभाषेत असलं पाहिजे. 6. भाषणाच्या शेवटी उपस्थित असलेल्या सर्वांचे आभारही मानले पाहिजेत. आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी राजधानी दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत तयारी सुरू झाली आहे. सरकारी कार्यालयांची रंगरंगोटी केली जात आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांची रंगीत तालीम सुरू झाली आहे. एनसीसीचे विद्यार्थी संचलन करण्याच्या तयारीमध्ये व्यग्र आहेत.