रेडी टू इट फूड
मुंबई, 09 डिसेंबर : बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक नव्या गोष्टींचा समावेश दैनंदिन आयुष्यात झाला. त्यातली एक गोष्ट म्हणजे रेडी टू इट पदार्थ किंवा झटपट तयार होणारे पदार्थ. बिझी वेळापत्रकामुळे असे पदार्थ वापरण्याकडे अनेकांचा कल असतो. नूडल्स, सूपपासून सुरू झालेली ही यादी आता भाज्या, आमटी, भात, पोळी, पराठे, केक, न्याहारीचे पदार्थ इथपर्यंत येऊन पोहोचली आहे. थोडक्यात दिवसभरातल्या प्रत्येक वेळच्या आहारासाठी रेडी टू इट पर्याय उपलब्ध आहे. या झटपट पदार्थांचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आहे. ब्राझीलमध्ये केलेल्या एका अभ्यासानुसार, अशा पदार्थांमुळे अनेक आजारांचा धोका वाढत असल्याचं समोर आलं आहे. ब्राझीलमध्ये 2019मध्ये रेडी टू इट पदार्थांबाबत एक अभ्यास करण्यात आला. अशा पदार्थांमुळे वेळेआधी मृत्यूचा धोका 10 टक्क्यांनी वाढतो असं त्यातून समोर आलं. त्या अभ्यासात 5 प्रकारच्या रेडी टू इट पदार्थांविषयी अभ्यास करण्यात आला होता. अमेरिकन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झालं होतं. अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थ दीर्घ काळ खाल्ल्यानं कॅन्सर, डायबेटीस, हृदयरोग या आजारांचा धोका वाढतो असं संशोधकांचं म्हणणं होतं. हेही वाचा - Bad Food For Thyroid : तुम्हाला थायरॉईडचा त्रास आहे? मग आजपासूनच या पदार्थांना म्हणा बाय-बाय “या संशोधनात आरोग्यावर परिणाम करणाऱ्या अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थांच्या धोक्याचं तुलनात्मक मूल्यांकन केलं होतं,” असं ब्राझीलच्या साओ पावलो विद्यापीठाचे प्रमुख आणि त्या संशोधनाचे लेखक एडुआर्डो निल्सन यांनी सांगितलं. संशोधनात असं आढळलं, की 2019मध्ये 30 ते 69 वयोगटातल्या 5 लाखांहून अधिक प्रौढ व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यापैकी 57 हजार म्हणजे 10.5 टक्के जणांचा वेळेआधी मृत्यू झाला व तो अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थांच्या सेवनाने झाला. ज्या देशांमध्ये रेडी टू इट पदार्थ जास्त खाल्ले जातात, तिथे ही आकडेवारी मोठी असू शकते, असं निल्सन यांचं म्हणणं आहे. रेडी टू इट पदार्थ गरम पाण्यात घालून शिजवायचे किंवा पॅकेटसह गरम करायचे असतात; मात्र हे पदार्थ आरोग्यासाठी चांगले नसतात. त्यात प्रिझर्व्हेटिव्ह्ज, कर्बोदकं, साखर व मीठ अतिरिक्त प्रमाणात असतं. त्यात स्वाद वाढवणारे काही घटक घातलेले असतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यात पोषणमूल्यं तर नसतातच. शिवाय डायबेटीस, लठ्ठपणा, वाईट कोलेस्टेरॉल आणि हृदयरोगाला यामुळे आमंत्रण मिळू शकतं. हेही वाचा- Free Condoms : इथं सरकारच 18 ते 25 वयोगटातील तरुणांना वाटतंय फ्री कंडोम; काय आहे कारण? जवळपास सगळे रेडी टू इट पदार्थ हे अल्ट्रा प्रोसेस्ड असतात. या पदार्थांमध्ये स्टार्च, साखर आणि फॅट्सचं भरपूर प्रमाण असतं. त्या पदार्थांवर अनेक प्रक्रिया होतात. पदार्थातली नैसर्गिक पोषणमूल्यं त्यामुळे कमी होतात. पिझ्झा, कटलेट, आलू टिक्की यांसारखं फ्रोझन फूड, चिप्स, तयार सूप, ब्रेकफास्ट सीरियल्स, कुकीज असे प्रक्रिया झालेले पदार्थ अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थांमध्ये मोडतात. निल्सन यांच्या म्हणण्यानुसार, अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थ ताजे नसतात. केवळ नफा कमावण्यासाठी ते तयार करण्यात आले आहेत. त्यांच्या साठवणुकीसाठी व ते तयार करण्यासाठी फारसं भांडवल लागत नाही. त्यामुळे वर्षांनुवर्षं साठवून विकण्यासाठी ते तयार केले जातात. कमी उत्पन्न असलेल्या वर्गाकडून याचं अधिक सेवन केलं जातं. कारण खाण्यावर ते जास्त खर्च करू शकत नाहीत. हे पदार्थ स्वस्तही असतात व सहज उपलब्ध होतात.