नवी दिल्ली, 25 जून : सध्याच्या काळात गर्भधारणा (Pregnancy) टाळण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या पर्यायांमध्ये नसबंदी, कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांचा समावेश आहे. गर्भनिरोधक गोळ्या (Birth Control Pills) आतापर्यंत केवळ महिलांसाठी उपलब्ध होत्या; पण पुरुषांसाठीदेखील अशा गोळ्या तयार करण्याबाबत संशोधन करण्यात आलं. त्यानुसार पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळ्या (Contraceptive Pills) बनवण्यात यश आलं आहे. या गोळ्यांमुळे जोडीदाराची प्रेग्नसी रोखणं शक्य होणार आहे. तसंच या गोळ्यांमुळे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. दोन गोळ्या घेतल्यास संबंधित पुरुषाच्या शरीरातली टेस्टोस्टेरॉन पातळी (Testosterone levels) आणि शुक्राणूंची (Sperm) संख्या कमी होऊ शकते, असा दावा एका अभ्यासातून करण्यात आला आहे. याविषयी माहिती देणारं वृत्त `आज तक`ने प्रसिद्ध केलं आहे. आतापर्यंत केवळ महिलांसाठीच गर्भनिरोधक गोळ्या उपलब्ध होत्या. परंतु, संशोधकांना पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळी तयार करण्यात नुकतंच यश आलं आहे. या गोळ्यांमुळे पुरुषांच्या आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होणार नाही, तसंच हेतूदेखील साध्य होईल, असं संशोधकांचं म्हणणं आहे. या गर्भनिरोधक गोळ्यांमुळे पुरुषांमध्ये कोणतेही दुष्परिणाम न होता टेस्टोटेरॉनची पातळी आणि शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते, असा दावा अभ्यासातून करण्यात आला आहे. हा अभ्यास अटलांटा येथे होणाऱ्या एंडोक्राइन सोसायटीच्या वार्षिक बैठकीत सादर केला जाणार आहे. यूएसमधल्या ‘युनिस केनेडी श्राइव्हर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ अॅंड ह्यूमन डेव्हलपमेंट’मधले गर्भनिरोधक विकास कार्यक्रमाचे प्रमुख तामार जेकब्सन यांनी सांगितलं, `पुरुषांमध्ये सध्या गर्भनिरोधक पद्धतीत नसबंदी आणि कंडोम हे दोन पर्याय उपलब्ध आहेत. महिलांच्या तुलनेत हे पर्याय खूपच मर्यादित आहेत. पुरुषांसाठी प्रभावी गर्भनिरोधक पद्धतींचा शोध लागल्याने अवांछित गर्भधारणा कमी करून एकूण आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल. यामुळे पुरुषांना कुटुंब नियोजनातही सक्रिय भूमिका बजावता येईल.` या संशोधनाच्या दोन टप्प्यांत करण्यात आलेल्या क्लिनिकल ट्रायलमध्ये (Clinical Trial) 96 निरोगी पुरुषांचा समावेश करण्यात आला होता. दोन्ही चाचण्यांदरम्यान, पुरुषांना 28 दिवसांसाठी रोज दोन किंवा चार औषधं तोंडाद्वारे देण्यात आली. काही जणांना औषधाऐवजी प्लासिबो देण्यात आलं. औषध घेत असलेल्यांची टेस्टोस्टेरॉनची पातळी सात दिवसांनंतर सामान्यपेक्षा कमी होती आणि प्लासिबो घेत असलेल्या पुरुषांची टेस्टोस्टेरॉनची पातळी सामान्य होती, असं दिसून आलं. औषध घेणाऱ्या 75 टक्के पुरुषांनी त्यांना हे औषध सुरू ठेवायचं आहे, असं सांगितलं. जे पुरुष रोज चार गोळ्या (400 mg) घेत होते, त्यांच्यातली टेस्टोस्टेरॉनची पातळी दोन गोळ्या (200 mg) घेतलेल्या लोकांपेक्षा कमी होती. DMAU आणि 11b-MNTDC नावाची दोन औषधं प्रोजेस्टोजेनिक अँड्रोजेन औषधांचा भाग आहेत. सामान्यतः टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी करणाऱ्या औषधांमुळे अनेक दुष्परिणाम होतात. ही औषधंदेखील टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी करतात; पण यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. ही औषध टेस्टोस्टेरॉनला दाबून टाकतात. त्यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होते. टेस्टोस्टेरॉन पातळी कमी करण्यासाठी पुरुष जी पद्धत वापरतात, त्यामुळे दुष्परिणाम होतात; पण संशोधनात जेव्हा या औषधांचा वापर करण्यात आला तेव्हा असं आढळून आलं, की बहुतांश पुरुषांना या औषधांचा आणखी वापर करायचा होता. क्लिनिकल ट्रायलमध्ये पुरुषांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून आले. तसंच त्यांनी हे औषध पुन्हा वापरण्याची इच्छा व्यक्त केली. यावरून आगामी काळात पुरुष बर्थ कंट्रोल उपाय नव्या उंचीवर जातील, अशी शक्यता वाटते, असं जेकब्सन यांनी सांगितलं.