लग्नाशिवाय कपलने लॉजवर राहणं गुन्हा नाही
ऑक्टोबरचा महिना सुरू झाल्याने साताऱ्यातील कासपठारावर फुलांची उधळण पाहायला मिळत आहे. याची युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नोंद झाल्याने आता देशभरातून पर्यटक या ठिकाणी येतात. अहमदनगरहून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या श्रुतिकाला इथं जाण्याची खूप इच्छा होती. तिने तिचा जवळचा मित्र संदिपला यासाठी गळ घातली. ठरल्याप्रमाणे दोघेही बाईकवर सातारला गेले. दिवसभर कासपठार आणि जवळपासच्या परिसरात मनसोक्त फिरले. श्रुतिकाची इच्छा पूर्ण झाल्याने तीही खूश होती. आता कधी एकदा हॉस्टेलवर जाऊन मैत्रीणींना फोटो दाखवतेय असं तिला झालं होतं. पण, नेमकं निघण्याच्या वेळी पाऊस सुरू झाला अन् दोघेही तिथेच अडकले. नाईविलाजाने त्यांनी रात्री तिथेच मुक्काम करुन सकाळी निघायचं ठरवलं. जवळच्याच्या एक लॉजमध्ये एक रूम बूक केली. रात्री जेवण झाल्यानंतर दोघे गप्पाच मार होते. तितक्यात दार वाजवल्याचा आवाज आला. आता कोण? असा विचार करतच संदिपने दार उघडलं. तर समोर पोलीस. कुणाची फसवणूक, कुणाचा छळ, कुणाला मानसिक त्रास, कुणाच्या वैयक्तित आयुष्यात ढवळाढवळ, कुणाच्या हक्कांवर गदा, प्रॉपर्टीचे वाद, कौटुंबिक कलह.. कुठल्याही विषयासंदर्भात कायदा काय सांगतो? शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, पण अनेकांनी ती चढून आपला हक्क मिळवला आहे. या कायद्याच्या गोष्टी सोप्या करून सांगणारी नवी सीरिज
#कायद्याचंबोला
. कायद्याच्या अभ्यासक वकिलांकडूनच तुम्हाला मिळेल अगदी खात्रीशीर माहिती. तुम्हालाही कुठल्या विषयी कायदेशीर शंका असतील तर
Rahul.Punde@nw18.com
या मेलवर आम्हाला सांगा.
अशी वेळ दोघांवर पहिल्यांदाच आल्याने दोघेही खूप घाबरले होते. काय करावं काही सुचेना. पोलीस आत येऊन विचारपूस करू लागले. दोघांनीही जे खरं होतं ते सर्व सांगितलं. पण, पोलिसांचा विश्वास बसला नसावा. चला पोलीस स्टेशनला म्हटल्यावर श्रुतिकाला रडूच कोसळलं. संदिपने कसंतरी तिला सावरत एक फोन करू द्यावा अशी पोलिसांनी विनंती केली. त्याने आपला वकील असलेला मित्र शिवाला फोन लावला. त्यावर शिवाने त्याला धीर देत फोन पोलिसांकडे द्यायला सांगितला. शिवाने आपल्या कायदेशीर भाषेत पोलिसांना समजावल्यानंतर पोलीस तिथून निघून गेले. अशी परिस्थिती कोणावरही येऊ शकते. अशी स्थितीत काही कायदे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. ..तर अशा वेळी घाबरू नका तुम्ही तुमच्या मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये राहत असाल आणि पोलीस आले तर सर्वात पहिला नियम म्हणजे घाबरण्याची गरज नाही. अविवाहित जोडप्याने हॉटेलमध्ये एकत्र राहणे हा गुन्हा नाही. त्यामुळे हॉटेलमध्ये राहणाऱ्या कोणत्याही अविवाहित जोडप्याला त्रास देण्याचा किंवा अटक करण्याचा अधिकार पोलिसांना नाही. अविवाहित जोडप्यांना हॉटेलमध्ये एकत्र राहण्याचा आणि परस्पर संमतीने शारीरिक संबंध ठेवण्याचा मूलभूत अधिकार आहे. मात्र, यासाठी अट अशी आहे की दोघेही प्रौढ असावेत. सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे म्हटले आहे की, संविधानाच्या कलम 21 मधील मूलभूत अधिकारामध्ये स्वतःच्या इच्छेने कोणासोबतही राहण्याचा आणि शारीरिक संबंध ठेवण्याचा अधिकार समाविष्ट आहे. यासाठी लग्न करणे आवश्यक नाही. याचा अर्थ असा की लग्नाशिवाय जोडपे हॉटेलमध्ये एकत्र राहत असतील तर तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे. हॉटेलमध्ये राहताना पोलिसांनी अविवाहित जोडप्याला त्रास दिला किंवा अटक केली, तर ते त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन मानले जाईल. पोलिसांच्या या कारवाईच्या विरोधात हे जोडपे राज्यघटनेच्या कलम 32 अन्वये थेट सर्वोच्च न्यायालय किंवा कलम 226 अंतर्गत थेट उच्च न्यायालयात जाऊ शकतात. वाचा - #कायद्याचंबोला: ST महिला कंडक्टरच्या एका Reels ने निलंबन! कारवाई योग्य आहे का? कायदेशीर उत्तर पोलिसांविरोधात कुठे तक्रार कराल? हॉटेलमध्ये राहणाऱ्या अविवाहित जोडप्याला त्रास देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा त्यावरील पोलीस अधिकाऱ्याकडेही तक्रार करता येईल. याशिवाय पीडित दाम्पत्याकडे मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करण्याचाही पर्याय आहे. हॉटेल प्रशासनाही अविवाहित जोडप्याला रोखू शकत नाही हॉटेल अविवाहित जोडप्याला दोघांनी विवाहित नसल्याच्या कारणावरुन थांबू शकत नाही. हॉटेलने असे केल्यास ते मूलभूत अधिकाराचे उल्लंघन मानले जाईल. याचा अर्थ अविवाहित जोडप्यांना हॉटेलचे भाडे देऊन आरामात राहता येते. याशिवाय, हॉटेल असोसिएशन ऑफ इंडियामध्ये असा कोणताही नियम नाही, ज्यामुळे अविवाहित जोडप्यांना कोणत्याही हॉटेलमध्ये राहण्यास प्रतिबंध होतो. पोलीस हॉटेलवर छापा का टाकतात? अविवाहित जोडप्याला अटक करण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठी पोलीस हॉटेल्सवर छापे टाकत नाहीत. देशात वेश्याव्यवसाय हा गुन्हा मानला जातो. अशा वेश्याव्यवसायाच्या विरोधात किंवा गुन्हेगार लपल्याच्या संशयावरून पोलीस हॉटेलमध्ये छापे टाकतात. हॉटेलमध्ये अविवाहित जोडपे राहत असतील आणि छापेमारीच्या वेळी पोलीस त्यांच्याकडे आले तर अशा जोडप्याने घाबरण्याची गरज नाही. पोलिसांच्या मागणीनुसार, अशा जोडप्याला त्यांचे ओळखपत्र दाखवावे लागेल, जेणेकरून दोघेही परस्पर संमतीने हॉटेलमध्ये राहत असल्याचे आणि कोणत्याही प्रकारच्या वेश्याव्यवसायात सहभागी नसल्याचे सिद्ध होईल. (कायदे वेळोवेळी बदलत असतात. वरील माहिती ही सध्याच्या कायद्यानुसार आहे. त्यामुळे कोणतीही कायदेशीर कारवाई करण्याअगोदर कायदेतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.) (लेखिका कायद्याच्या अभ्यासक असून पुण्यात कायदेशीर सल्लागार आणि पुणे जिल्हा न्यायालयात वकील म्हणूनही कार्यरत आहेत.)