JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Holding Pee Side Effects: लघवी रोखून धरल्यामुळे काय होतं? कळालं तर कधीच करणार नाही ही चूक

Holding Pee Side Effects: लघवी रोखून धरल्यामुळे काय होतं? कळालं तर कधीच करणार नाही ही चूक

वारंवार लघवी रोखून धरणं, लघवीला जाणं टाळणं यामुळे गंभीर आजार होऊ शकतात.

जाहिरात

Urinary incontinence

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 15 जुलै : आरोग्याच्या (Health) दृष्टीने नैसर्गिक शारीरिक क्रिया महत्त्वाच्या असतात. लघवीला जाणं ही त्यातली सर्वांत महत्त्वाची क्रिया आहे. मूत्राशय (Bladder), मूत्रमार्गाचं कार्य सुरळीत सुरू राहावं, यासाठी वेळेवर लघवीला (Peeing) जाणं गरजेचं आहे. काही जण बऱ्याचदा लघवीला जाणं टाळतात. बऱ्याचदा प्रवासात असल्याने किंवा कामामुळे असं घडू शकतं. काही जण आळशीपणामुळेही लघवी रोखून धरतात; पण लघवी रोखून धरणं अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देणारं ठरू शकतं. लघवी रोखून धरणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. पेल्व्हिक फ्लोअरचे स्नायू (Pelvic Floor Muscle) कमकुवत होऊ नयेत यासाठी लघवी रोखून धरणं टाळावं, असं आरोग्यविषयक तज्ज्ञ सांगतात. `आज तक`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. वारंवार लघवी रोखून धरणं, लघवीला जाणं टाळणं यामुळे गंभीर आजार होऊ शकतात. तसंच ओटीपोटीच्या स्नायूंवर विपरीत परिणाम होऊ शकतो. सरासरी प्रौढ व्यक्तीचं मूत्राशय दोन कप लघवी रोखून धरून शकतं. जेव्हा मूत्राशय एक चतुर्थांश भरलेलं असतं तेव्हा ते तुमच्या मेंदूला संदेश पाठवतं. जेव्हा तुम्ही लघवी बराच काळ रोखून ठेवता तेव्हा धोकादायक बॅक्टेरिया वाढू लागतात. यामुळे तुम्हाला युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन अर्थात यूटीआयचा (UTI) सामना करावा लागू शकतो. यूटीआय खूप वेदनादायक असतो. यूटीआय झालेल्या रुग्णाला लघवी करताना खूप वेदना सहन कराव्या लागतात. यूटीआयवर वेळेत उपचार घेतले नाहीत, तर बॅक्टेरियाचा (Bacteria) संसर्ग पसरू लागतो आणि त्याचं रूपांतर सेप्सिसमध्ये होऊ शकतं. Kegel8 चे संस्थापक आणि आरोग्य तज्ज्ञ स्टेफनी टेलर यांनी सांगितलं, `मूत्राशय पूर्ण भरल्यानंतर लघवी जाणं टाळल्यास अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. लघवी बराच काळ रोखून धरल्यास पेल्व्हिक फ्लोअरवर विपरीत परिणाम होऊ शकतो. लघवी जास्त काळ रोखून धरल्याने मूत्राशयातले स्नायू आवश्यकतेनुसार आकुंचन पावण्याची क्षमता गमावतात. यामुळे मूत्राशय पूर्णपणे रिकामं होऊ शकत नाही. लघवी रोखून ठेवल्याने इच्छा असूनही लघवी करण्यात अडचणी येऊ शकतात. इतकंच नाही, लघवी जास्त वेळ राखून ठेवल्याने कोरडेपणाच्या समस्येला सामोरं जावं लागतं. तसंच लघवीवरचं नियंत्रण सुटण्याच्या समस्येलाही तोंड द्यावं लागतं,` असं टेलर यांनी सांगितलं. `पेल्विक फ्लोअर म्हणजेच ओटीपोट नीट काम करतंय की नाही हे अनेक गोष्टींच्या माध्यमातून समजू शकतं. यामध्ये खोकताना किंवा शिंकताना लघवी होणं आणि वारंवार लघवीला जावंसं वाटणं यांचा समावेश आहे. तुम्हाला पेल्व्हिक फ्लोअरमध्ये आणि शारीरिक संबंधादरम्यान वेदना होऊ शकतात. बद्धकोष्ठता आणि मलविसर्जनावेळी सतत होणाऱ्या वेदना तुमचं पेल्व्हिक फ्लोअर कमकुवत आहे, असं सूचित करतात,` असं स्टेफनी टेलर यांनी सांगितलं. संभाव्य समस्या टाळण्यासाठी काही उपयायोजना करणं आवश्यक आहे. पेल्व्हिक फ्लोअर कमकुवत झाल्यानं वारंवार लघवीला जावं लागतं. त्यामुळे पेल्व्हिक फ्लोअर कमकुवत होऊ नये, यासाठी मूत्राशय भरल्याची जाणीव झाल्यावर तातडीनं लघवीला जाणं आवश्यक आहे. `अनेक लोक पार्टीत मद्यपान (Drinking) करतात. त्यामुळे लवकर लघवी होते. मद्यपानामुळे मूत्राशयाचं कार्य बिघडतं. त्यामुळे मर्यादित मद्यपान करणं आवश्यक आहे. महिलांमध्ये मासिक पाळीच्या (Menstrual cycle) शेवटच्या दिवसांमध्ये एस्ट्रोजनेची पातळी कमी झाल्यानं पेल्व्हिक फ्लोअरचे स्नायू कमकुवत होतात. त्यामुळे वारंवार लघवी करण्याची गरज भासते. मासिक पाळीमध्ये पॅड किंवा टॅम्पॉनपेक्षा मेंस्ट्रुअल कप (Menstrual Cup) पाच पटीहून अधिक रक्त रोखून धरतो, तसंच तो 12 तासांपर्यंत टिकतो. त्यामुळे त्याचा वापर करावा,` असं स्टेफनी टेलर यांनी नमूद केलं. एकूणच, ओटीपोटाचे स्नायू कमकुवत होऊ नयेत, मूत्राशयाचं कार्य सुरळीत चालावं यासाठी लघवी रोखून धरणं टाळावं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या