मुंबई, 14 जुलै : युरिन (Urine) अर्थात लघवीशी संबंधित समस्यांमागे अनेक कारणं असू शकतात. वय, संसर्ग आणि अन्य गंभीर आजार ही त्यापैकीच काही कारणं आहेत. युरिनशी संबंधित समस्यांकडे वेळीच लक्ष देणं आवश्यक असतं. महिलांना खोकताना, शिंकताना, धावताना अचानक थोडं मूत्रविसर्जन होण्याची समस्या अनेकदा जाणवते. यासोबतच वारंवार लघवीला जावं लागणं, शारीरिक संबंधावेळी समाधान कमी होणं, वेदना होणं अशा समस्या जाणवतात. या समस्यांमागे अनेक कारणं असू शकतात. परंतु, ओटीपोट (Pelvic) हे बऱ्याचदा या समस्येचं मूळ असतं. त्यासाठी ओटीपोटाचे व्यायाम, योग्य आहार आवश्यक असतो. ‘हरजिंदगी डॉट कॉम’ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. सध्याच्या काळात पुरुषांप्रमाणेच महिलाही फिटनेसकडे (Fitness) विशेष लक्ष देतात. फिटनेस फ्रीक महिलांना हॅमस्ट्रिंग्ज, पोट आणि बायसेप्स टोन्ड आणि मजबूत कसे ठेवायचे हे माहिती असतं. शरीरातले इतर स्नायू बळकट व्हावेत, यासाठी महिला जसा प्रयत्न करतात, तसाच पेल्व्हिक फ्लोअरसाठीही करणं आवश्यक आहे. “मूत्राशय, आतड्याचं कार्य, लैंगिक जीवन, बाळंतपण आदी गोष्टींमध्ये ओटीपोटाचा भाग महत्त्वाची भूमिका बजावतो. पेल्व्हिक फ्लोअर (Pelvic Floor) हा ओटीपोटीच्या खाली असलेल्या स्नायूंचा एक समूह आहे, जो टेलबोनपासून पसरलेला असतो. जेव्हा मूत्राशय मूत्रामुळे भरतं, तेव्हा त्याचं नियंत्रण स्नायूंवर अवलंबून असतं. हे नियंत्रण व्यवस्थित राहावं, यासाठी मूत्राशयाच्या भोवतीचे स्नायू बळकट असणं आवश्यक आहे. मूत्रमार्गाच्या भोवतीचे पेल्व्हिक फ्लोअर स्नायू युरिनवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करतात. काही कारणांमुळे हे स्नायू (Muscle) बळकट नसतील तर महिलांना वारंवार युरिनला जावं लागणं, खोकताना, शिंकताना, धावताना युरिन होणं आदी समस्यांना तोंड द्यावं लागतं. काही व्यायामप्रकार आणि योग्य आहाराच्या मदतीनं ही समस्या दूर होऊ शकते”, अशी माहिती बेंगळुरू इथल्या मातृत्व रुग्णालयाच्या कन्सल्टंट फिजिओथेरपिस्ट, सर्टिफाइड डाएट कौन्सिलर आणि एमआयएपी डॉ. स्वाती रेड्डी (पीटी) यांनी दिली. ( Breast milk चा रंग वारंवार बदलतो; यामागे काही चिंतेचं कारण आहे का? ) पोटाच्या खालचा भाग, पोश्चर आणि मणक्याला आधार देण्यासाठी ओटीपोटाचे स्नायू महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. अवयवांना आधार देणं, स्थिरता, स्फिंक्टरिक फंक्शन आणि रक्ताभिसरण ही पाच महत्त्वपूर्ण कामं पेल्व्हिक फ्लोअरचे स्नायू करतात. हे स्नायू वाढत्या वयापरत्वे किंवा अन्य कारणांमुळे कमकुवत होतात आणि अधिक ताणले जातात. गर्भधारणा (Pregnancy) आणि डिलिव्हरी यामुळेदेखील हे स्नायू कमकुवत होतात. हे स्नायू कमकुवत झाले तर पाठीच्या खालच्या बाजूला वेदना होणं, पोट आणि ओटीपोट जड वाटणं, हसताना, शिंकताना, धावताना युरिन होणं, शारीरिक संबंधावेळी समाधान कमी मिळणं आणि वेदना होणं, वारंवार टॉयलेटला जावं लागणं आणि वारंवार लघवीला होणं या समस्या निर्माण होतात. पेल्व्हिक फ्लोअर एक्सरसाइज (Pelvic floor exercises) या समस्यांवर सर्वोत्तम उपाय ठरू शकतात. यामुळे ओटीपोटाचे स्नायू मजबूत होतात. हे व्यायामप्रकार महिलांनी (Women) रोज करणं गरजेचं आहे. हे व्यायाम वेगवेगळ्या पोझिशनमध्ये करता येतात. एका खुर्चीत (ऑफिसमध्ये) आरामात बसा किंवा तुमचे पाय क्रॉस करून (घरात) बसा. तुमचे पेल्व्हिक फ्लोअरचे स्नायू वरच्या दिशेनं असे ताणा, की जणू तुम्ही युरिनचा प्रवाह थांबवण्याचा प्रयत्न करत आहात किंवा एखाद्या लहान वस्तूला धरण्यासाठी स्नायूंचा वापर करत आहात. यामुळे स्नायू बळकट होतात आणि तुमच्या हिप्सच्या स्नायूंना घट्ट करण्याऐवजी फक्त पेल्व्हिक फ्लोअरवर लक्ष केंद्रित होते. तुम्ही श्वास घेताना पोटाचा आकार वाढतो आणि पेल्व्हिक स्नायू ताणले जातात. तुम्ही तोंडातून श्वास सोडत असताना तुमचं पोट आत खेचलं पाहिजे आणि पेल्व्हिक फ्लोअरचे स्नायू वर ताणले पाहिजेत. पाच सेकंद विश्रांती घेऊन ही क्रिया पुन्हा करावी. हा व्यायाम झोपूनही करता येतो. गुडघे वाकवून जमिनीवर पाठ टेकवत पाय जमिनीवर सपाट ठेवून झोपा आणि ओटीपोटाचे स्नायू घट्ट करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर शरीर वर उचलण्याचा प्रयत्न करा आणि काही सेकंद अशीच पोझिशन ठेवा. जसा या व्यायामाचा सराव होईल तसं शरीर वर उचलून रोखून धरण्याचा कालावधी वाढेल. सर्वांत सोपं म्हणजे हा स्नायू पिळण्याचा प्रयत्न करा आणि त्याला सोडून द्या. असं पुन्हा दोन वेळा करा. “हा व्यायाम दिवसभरात कोणत्याही वेळी करता येतो. परंतु, व्यायामापूर्वी ब्लॅडर रिकामं असणं आवश्यक आहे. हा व्यायाम योग्य प्रकारे केला तर महिलांच्या समस्या दूर होतात. ही समस्या पुरुषांमध्येही दिसून येते. त्यामुळे स्नायू बळकट करण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. स्नायू कमकुवत झाल्याने युरिनशी निगडीत समस्या अधिकच वाढत असेल तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा”, असं डॉ. रेड्डी यांनी सांगितलं. महिलांना वारंवार युरिनला जावं लागणं, हसताना, शिंकताना, खोकताना अचानक युरिन होणं आदी समस्या ओटीपोटाच्या स्नायूमुळे निर्माण होतात. हे स्नायू बळकट होण्यासाठी योग्य आहार (Diet) गरजेचा आहे. “रोजच्या आहारात फायबर आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश असावा. तसेच पुरेशा प्रमाणात पाणी पिणं आवश्यक आहे. अतिरिक्त वजन वाढलं असेल तर ते कमी करावं. यामुळे पेल्व्हिक फ्लोअरवरचा ताण कमी होतो. पेल्व्हिक फ्लोअरचे स्नायू कमकुवत झाले असतील तर जास्त वजनाच्या वस्तू उचलणं, धावणं टाळावं. टॉयलेटमधून बाहेर येण्यापूर्वी ब्लॅडर संपूर्ण रिकामं झालं आहे की नाही याची खात्री करावी. डिलिव्हरीनंतर डायस्टॅसिस रेक्टीची तपासणी करा. कारण त्याचा पेल्व्हिक स्नायूंच्या ताकदीवर परिणाम होऊ शकतो”, असं डॉ. शेट्टी यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







