वॉशिंग्टन, 08 ऑक्टोबर : कोरोनाच्या परिस्थितीत अमेरिकेमध्ये (america) सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राष्ट्रध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी सुरू असलेल्या प्रक्रियेदरम्यान उमेदवारांमध्ये चढाओढ सुरू आहे. बुधवारी रात्री उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार माइक पेन्स (Mike Pence) आणि कमला हॅरिस (kamla harris) यांच्यातील जाहीर वादविवाद सभा झाली. या सभेत एका माशीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. माइक पेन्स बोलत असताना त्यांच्या डोक्यावर माशी बसली. पेन्स यांच्या पांढऱ्या शुभ्र केसांमध्ये ही काळी माशी सर्वांचे लक्ष वेधत होती़ आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यावर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पेन्स यांना ट्रोल केलं जाऊ लागलं आहे.
महत्त्वाच्या मुद्द्यांवरून या डिबेटमध्ये गदरोळ उडाल्याचे चित्र होतं. मात्र बायडेन आणि ट्रप्म यांच्यातील वादविवाद सभेपेक्षा या सभेत कमी गोंधळ पाहायला मिळाला. कोविड 19 महासाथ हातळण्यात डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रशासन अन्य कुठल्याही प्रशासनापेक्षा सपशेल अपयशी ठरल्याचा घणाघाती आरोप हॅरिस यांनी यावेळी केला. ट्रम्प यांच्या विश्वासाहर्तेबद्दल प्रश्न उपस्थित करून अमेरिकेत भविष्यात येणाऱ्या कोरोना लशींवरील लोकांचा विश्वास हॅरिस यांनी कमी केल्याचा पलटवार पेन्स यांनी केला. अमेरिकेच्या इतिहासात कोणतं प्रशासन अपयशी ठरलं आहे, हे जनतेने पाहिलं असल्याचं ते म्हणाले.
असा वादविवाद सुरू असताना एक माशी तिथं आली आणि पेन्स यांच्या डोक्यावरील पांढऱ्याशुभ्र केसांमध्ये जाऊन बसली आणि मग काय या माशीनेच सर्व शो ताब्यात घेतला़. महत्त्वाच्या मुद्द्यांपेक्षा माशी लक्षवेधी ठरली. अमेरिकेत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यात ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली आहे आणि एकंदरच अमेरिकेतील कोरोनाचा संसर्ग बघता अनेकांनी उपाययोजनांबाबत टीका केली होती. सुरुवातीला अमेरिकेत कोरोनाचा अक्षरश: विस्फोट झाला होता़ विरोधकांनी या मुद्दयांवरून आता सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्यास सुरूवात केली आहे. दुसरीकडे सत्ताधारीही त्यांची बाजू मांडत आहेत.