मुंबई, 15 मार्च : जंगल सफारीचा आनंद काही औरच… पण कधी कधी ही मजा जीवावरही बेतू शकते. म्हणजे हिंसक किंवा मोठमोठे प्राणी अंगावर धावून येण्याचा धोकाही असतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक हत्ती पर्यटकांच्या गाडीवर धावून आला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर धडकीच भरते. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या सोशल मीडियावर हत्तीचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात पर्यटकांच्या गाडीच्या समोर आणि नंतर मागे हत्ती धावत जातो.
व्हिडीओत पाहू शकता, पर्यटकांची गाडी जात असते तेव्हा एका हत्ती समोरून धावत येताना दिसतो. गाडी पाहून तो गाडीच्याच दिशेनं वेगानं धावतो. तो आता गाडीवर हल्ला करणार की काय असंच वाटतं. यावेळी गाडीत बसलेले पर्यटकदेखील आरडाओरडा करतात. सुदैवाने हत्ती गाडीजवळ पोहोचायच्या आधीच गाडी पुढे निघून जाते. पण हत्ती काही गाडीचा पिच्छा सोडत नाही. तो गाडीच्या मागे धावत सुटतो. जोपर्यंत शक्य असतं तोपर्यंत तो गाडीमागे धावतो. पण काही वेळात गाडी त्याच्यापासून बरीच दूर निघून जाते तेव्हा मात्र तो थांबतो. तेव्हा कुठे पर्यटक सुटकेचा निश्वास टाकतात. हे वाचा - अरे हे काय? एवढ्याशा कुत्र्याला घाबरून बिबट्यानेही ठोकली धूम; पाहा VIDEO पुढे गेल्यानंतर गाडीच्या पुढे दुसरा एक हत्ती येतो. तोसुद्धा पळता पळता मागे वळून पाहतो. पुढे गेल्यानंतर तो रस्त्यातून बाजूला होता आणि गाडी आपल्या मार्गाने निघून जाते.