JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / तुम्हालाही सण-उत्सवातील मजा-मस्ती नकोशी वाटते? मानसिक आजार तर नाही ना?

तुम्हालाही सण-उत्सवातील मजा-मस्ती नकोशी वाटते? मानसिक आजार तर नाही ना?

वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी आता सणाचंच औचित्य असावं लागतं असं नाही. वर्षभर असे पदार्थ उपलब्ध असतात. सण, संस्कृती यांबद्दलची आत्मीयता कमी झालीय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर : सणासुदीच्या दिवसात सर्वत्र उत्साहाचं वातावरण असतं. आनंदाने सण साजरे केले जातात. सणाच्या निमित्ताने नव्या वस्तू विकत घेतल्या जातात. भरपूर शॉपिंग करतात; पण काहीजणांना सण साजरे करायला आवडत नाही. अजिबात उत्साह वाटत नाही. एकटं राहावंसं वाटतं. गर्दी, सोहळा, नातेवाईकांसोबत आनंद घेणं अगदी नकोसं वाटतं. उदासीन, जगापासून वेगळं राहावंसं वाटतं. ही मनोवस्था म्हणजे मानसिक स्वास्थ्य बिघडल्याचे संकेत असू शकतात. याबाबत माहिती देणारं वृत्त ‘आज तक’ने दिलं आहे. आपल्या सभोवती अनेक जण असे असतात, ज्यांना सेलिब्रेशनमध्ये रसच नसतो. काही जणांना सणाच्या दिवशी निराश, निरुत्साही वाटतं. अशांचा सणांबद्दलचा दृष्टिकोन उदासीन असतो. तसंच सण साजरे करणार्‍यांबद्दलही चीड असते. याबद्दल मानसशास्त्र काय सांगतं ते जाणून घेऊ या. फेस्टिव्ह अँक्झायटी दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलचे ज्येष्ठ मानसोपचातज्ज्ञ डॉ. राजीव मेहतांनी याबाबत आपलं मत नोंदवलं. ते म्हणतात, की या गोष्टींकडे आपण दोन प्रकारे पाहायला हवं. पहिल्या प्रकार हा, की ज्या व्यक्तींच्या लहान मेंदूत सणांशी निगडित एखाद्या अपघाताची किंवा वाईट आठवण असते. सणासुदीच्या दिवसात घडलेला अपघात, प्रेमभंग, बालपणीची वाईट आठवण, सणाच्या दिवशी कौटुंबिक कलह आणि नाजूक आर्थिक परिस्थिती यामुळे कमीपणा वाटत राहणं अशा अनेक बाबींचा त्यात समावेश होतो. अशा व्यक्तींना सणाच्या दिवशी निराश आणि अस्वस्थ वाटतं. दुसरा प्रकार हा नैराश्यग्रस्तांच्या बाबतीत आढळतो. नैराश्यग्रस्त व्यक्ती आपलं दैनंदिन आयुष्य व्यवस्थित जगतात. परंतु, समारंभात सहभागी होण्यास तयार नसतात. आता आपण लोकांना भेटणार या विचारानेच त्या अस्वस्थ होतात. मानसशास्त्रात याला फेस्टिव्ह अँक्झायटी असं म्हणतात. नैराश्याचा न्यूनगंड अशा व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी सहभागी होण्यास मज्जाव करतो. समारंभाला न येण्याच्या सबबी सांगितल्या जातात. खरं तर त्यांना समारंभात, कार्यात सहभागी व्हायचं असतं. परंतु, नैराश्यामुळे ते वेळेचा दुरुपयोग आणि सणांचा हेतू असे प्रश्न उपस्थित करतात. असू शकतात अ‍ॅन्हेडोनियाची लक्षणं दिल्लीच्या एम्स रुग्णालयाचे डॉ. अनिल शेखावत म्हणाले, की ही मानसिकता व्यक्तीची प्रवृत्ती आणि एकंदर वैयक्तिक आयुष्यावर अवलंबून असते. अनेकदा व्यक्तीचा भवताल, जडणघडण आणि आनुवंशिक गुण यातून त्याचं व्यक्तिमत्त्व घडतं. ठराविक काळानंतर त्या व्यक्तीला सण साजरे करण्यातला तोचतोचपणा यांत आनंद, उत्साह वाटत नाही. मग त्या व्यक्तीला त्या सोहळ्यात नावीन्य वाटेनासं होतं. अनेक जण या सोहळ्यांचा तार्किक अंगाने विचार करतात. त्यांना असं वाटतं की, जुन्या रूढी-परंपरांचा देखावा करण्यात अर्थ नाही. अशा व्यक्तींचा सोहळा साजरा करण्याचा उत्साह कमी होतो. डॉ. शेखावत म्हणाले, की मानसशास्त्रात या अवस्थेला अ‍ॅन्हेडोनिया म्हटलं जातं. या अवस्थेत व्यक्ती अशा गोष्टींबद्दल उदासीन राहते; पण ती पूर्वी आनंदाने सोहळ्यात सहभागी होत असे. अशा व्यक्ती सणांचा आनंद घेऊ शकत नाहीत. हा डिप्रेशनचाच एक प्रकार आहे. परंतु, हा एखादा मानसिक आजारही असू शकतो. अनेक जण अ‍ॅन्हेडोनियाच्या समस्येला तोंड देत आहेत. हे केवळ सणांपुरतंच मर्यादित असेल तर ही गंभीर बाब नाही. परंतु, दैनंदिन आयुष्यात अर्थात म्युझिक, सेक्स, आहार किंवा कोणत्याही समारंभात या व्यक्तींना उदासीन वाटत असेल तर हे डिप्रेशनचं (नैराश्याचं) लक्षण आहे. मानसशास्त्रात याला डिस्टेमियाही म्हटलं जातं. या आजारात नैराश्य, अनिद्रा, थकवा, आत्मविश्वासाची कमतरता असं सारखं वाटत राहतं. हा मानसिक आजार आहे. त्यात व्यक्तीला निरुत्साही, उदासीन वाटतं. आज विजया दशमी दसरा, शस्त्रपूजा आणि दुर्गा विसर्जनाचा शुभ मुहूर्त जाणून घ्या सामाजिक रचनेत होणारे बदल दिल्लीच्या आयएचबीएएसमधले ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. ओमप्रकाश यांनीही यावर मत मांडलं. सामाजिक रचनेतले बदल हेदेखील या मानसिकतेमागचं एक कारण आहे आणि त्यावर अजून संशोधन झालेलं नाही, असं ते म्हणतात. सण-उत्सव हे माणसाच्या दैनंदिन आयुष्यात आनंद घेऊन येतात, जेणेकरून जगण्यातला तोचतोपणा, उदासीनता यातून मोकळीक मिळते. परंतु, सध्याच्या कॉर्पोरेट कल्चरमुळे कामांचे तास वाढलेत. तसंच फ्लॅटमध्ये राहण्याने समाजाशी नाळ तुटली आहे. अनेकदा शेजारीपाजारी कोण राहतंय याचीही माहिती नसते. विभक्त कुटुंबपद्धतीचा जीवनशैलीवरही परिणाम झालाय. वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी आता सणाचंच औचित्य असावं लागतं असं नाही. वर्षभर असे पदार्थ उपलब्ध असतात. सण, संस्कृती यांबद्दलची आत्मीयता कमी झालीय. सणाच्या दिवशी अनेक जण फिल्म्स पाहायला जातात. सणाच्या दिवशी मिळालेल्या सुट्टीचा उपयोग विश्रांतीसाठीही केला जातो. क्लब क्लचरपेक्षा कोणत्याही गोष्टीत रस वाटत नाही. एकंदर खाण्यापिण्याच्या सवयी, शॉपिंगच्या पद्धती या सगळ्यात आमूलाग्र बदल झालेत. सण-उत्सवाच्या वेळेस केल्या जाणार्‍या यासारख्या गोष्टी आता पूर्णत: बदलल्या आहेत. समाजरचनेतल्या या बदलामुळे आयुष्यात मानसिक ताण, अँक्झायटी आणि नैराश्यात वाढ होतेय. यामुळे एकटेपणा खूप वाढीस लागतो, असं डॉ. ओमप्रकाश म्हणतात. नवरात्रीत दुर्गामातेच्या पूजेवेळी या मंत्रांचा करा पाठ; मनोकामना होतील पूर्ण तुम्हालाही सण साजरे करण्याची इच्छा नसेल, तर… 1. सोहळे, समारंभाबद्दल तुम्ही उदासीन असाल तर समुपदेशकाचं (Counsellor) मार्गदर्शन घ्यावं. 2. सोहळे, समारंभ सोडून तुम्ही इतर सेलिब्रेशनमध्ये सहभागी होत असाल, तर काळजी करण्याचं कारण नाही. 3. कोणावरही आपली आवड लादू नका. इतरांना सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भरीस पाडू नका. 4. अनेक वर्षं तुम्हाला सणाच्या दिवशी उदासीन किंवा अस्वस्थ वाटत असेल तर तुम्ही मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घेणं आवश्यक आहे. तुम्ही नैराश्यग्रस्त असू शकता. 5. सणाच्या दिवशी तुमची चिडचिड होत असेल, घरातल्यांवर चिडत असाल तर तुम्ही मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. अकारण होणारी चिडचिड घरातल्यांच्या मनात तुमच्याबद्दल गैरसमज पसरवू शकते. 6. अनेक वर्षं एकाच ठिकाणी राहिल्याने सणाचा उत्साह कमी झाला असेल, तर नव्या ठिकाणी जाऊन नवा मित्र-परिवार तयार करा. त्यांच्यासोबत आनंद घ्या. 7. अ‍ॅन्हेडोनियाच्या समस्येशी तोंड देत असाल, खाणं, फिरणं यातून आनंद मिळत नसेल तर मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. 8. एखादी जुनी दु:खद आठवण तुमच्या सणाच्या आनंदावर विरजण घालत असेल तर तुम्ही पोस्ट ट्रॉमॅटिक कौन्सिलिंगचा आधार घ्यावा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या