मुंबई, 13 ऑक्टोबर : दिवाळी (diwali) म्हटलं रंगबेरंगी लाइट्स, तोरण आणि फटाके आणि अगदी स्वस्तात या वस्तू खरेदी करायच्या म्हणजे चिनी माल (china items). पण आता भारत आणि चीनमध्ये (India-China) सध्या मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण आहे. सीमेवर चीनने भारताच्या काही भूभागावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला आहे. यानंतर केंद्र सरकारने चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे. शिवाय भारतात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. चीनमधून कोणत्याच वस्तूंची आयात केली जात नाही आहे. अशात भारतात पुढील महिन्यात दिवाळी येऊन ठेपली आहे. मात्र त्यासाठी आता चिनी बाजारपेठेला मागे टाकत भारतीय बाजारपेठही सज्ज झाली आहे. दरवर्षी भारतात मोठ्या प्रमाणात चिनी वस्तू विकल्या जातात. पण यावर्षी बाजारात चिनी वस्तू दिसणार नसून भारतात बनवलेल्या वस्तूच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या वस्तू अतिशय स्वस्त किमतीत मिळणार आहेत. चार राज्यांमध्ये या वस्तू तयार करण्याचं काम सुरू असून मागील 2 महिन्यांपासून याची तयारी सुरू झाली आहे. भारतातील व्यापाऱ्यांची संस्था कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितलं, या वर्षी बाजारात चीनच्या वस्तू विक्रीसाठी नसणार आहेत. त्यामुळे भारतीय बाजार नावाच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही या वस्तूंची निर्मिती करत आहोत. महाराष्ट्र, बिहार, यूपी आणि झारखंडमध्ये यासाठी वस्तू तयार केल्या जात आहेत. या चार राज्यांमधून तयार होणाऱ्या वस्तू संपूर्ण भारतात विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. परदेशात राहणारे भारतीयदेखील भारतातूनच दिवाळीसाठी सामानाची मागणी करत आहेत. हे वाचा - दसरा दिवाळीआधी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठं गिफ्ट! सरकार विनाव्याज देणार 10000 या वस्तूंमध्ये तुम्हाला विविध प्रकार मिळणार असून सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये तुम्हाला 150 रुपयांचं कॅशबॉक्स देखील मिळणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या वेळी तुम्हाला याचा खूप उपयोग होणार आहे. भारतीय बाजारांमध्ये तुम्हाला 36 इंचाचं तोरण फक्त 340 रुपयांना मिळणार आहे. त्याचबरोबर विविध प्रकारचे दिवेदेखील मिळणार आहेत. चार दिव्यांच्या सेटची किंमत 45 रुपये असून विविध प्रकारचे आणखी सजावटीचे साहित्य देखील मिळणार आहे. तुम्हाला या वस्तू खरेदी करायच्या असतील तर तुम्ही 8800449679 या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधू शकता, असं खंडेलवाल यांनी सांगितलं.