JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Holi 2021: कुठे धुळवड तर कुठे उक्कुली अन् बरंच काही..! जाणून घ्या विविध रंगांप्रमाणेच असणाऱ्या वेगवेगळ्या परंपरा

Holi 2021: कुठे धुळवड तर कुठे उक्कुली अन् बरंच काही..! जाणून घ्या विविध रंगांप्रमाणेच असणाऱ्या वेगवेगळ्या परंपरा

29 मार्च 2021 ला म्हणजेच सोमवारी होळी आहे. भारतात राधा-कृष्णाच्या प्रेमाचं प्रतीक (love of Radha and Krishna) या सणातून जागवलं जातं. याच निमित्तानं बघूया भारतात कशी साजरी (Traditions of Holi in India) होते होळी.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 27 मार्च : जगात ग्रीस, इजिप्तसारखीच भारतातील हडप्पा संस्कृतीही खूप प्राचीन आहे. या संस्कृतीची वेगवेगळी वैशिष्ट्यही (Traditions of Holi in India) आहेत. त्यामुळेच आज इतक्या शतकांनंतरही त्याचं नाव अजरामर राहिलंय. भारतीय संस्कृतीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे विविधतेत एकता. जगभरातून आलेल्या आक्रमकांनाही या संस्कृतीनी सामावून घेतलं आणि ते हिंदुस्थानात स्थायिक झाले. त्यांच्या पुढच्या पिढ्याही गर्वाने आपण हिंदुस्थानी असल्याचं सांगतात. याचा परिणाम भारतातील विविध राज्यांत वसलेल्या लोकांचं राहाणीमान, पेहराव, भाषा, चालीरिती, उत्सव साजरे करण्याच्या पद्धती यावर झाला. हे सगळे वेगवेगळे आहेत. एकच सण संपूर्ण देशात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. 29 मार्च 2021 ला म्हणजेच सोमवारी होळी आहे. भारतात राधा-कृष्णाच्या प्रेमाचं प्रतीक (love of Radha and Krishna) या सणातून जागवलं जातं. याच निमित्तानं बघूया भारतात कशी साजरी होते होळी. महाराष्ट्रातील होळी, धुळवड आणि रंगपंचमी (Holi, Dhulwad, Rang Panchami) महाराष्ट्रात होळीच्या दिवशी वर्गणी गोळा करून गाईच्या शेणाच्या गोवऱ्या, लाकडं, एरंडाची फांदी, ऊस यांची होळी उभारली जाते. या होळीला पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो. नारळ फोडला जातो आणि नंतर तिचं दहन केलं जातं. हे पण राक्षसी होलिकेचंच दहन असतं. होळीमध्ये सर्व दुर्गुण जळून जावे अशी सगळेजण प्रार्थना करतात. होळी पेटवल्यावर बोंबा मारण्याचीही प्रथा आहे. वर्षभरात केवळ घरातली व्यक्ती निवर्तली तरच बोंबा मारल्या जातात एरव्ही बोंब मारणं वाईट समजलं जातं. पण होळीला सगळे बोंबा मारतात. दुसरा दिवस असतो धुळवडीचा किंवा धुलिवंदनाचा. या दिवशी होळीच्या राखेने एकमेकांना रंगवलं जातं आणि पाण्याने धुळवड साजरी केली जाते. काही ठिकाणी तर चिखलानी धुळवड खेळली जाते. महाराष्ट्रात वसंत पंचमीच्या दिवशी रंगपंचमी साजरी होते त्यामध्ये विविध रंग, पिचकाऱ्या वापरून रंगांच्या पाण्याने होळी खेळली जाते. आसाममधला फाकुवा किंवा फागुवा (Phakuwa/Phaguwa) आसाममध्ये होळीला फाकुवा म्हणतात आणि ती दोन दिवस असते. पहिला दिवस फाकुवा या दिवशी पौराणिक कथेतील होलिका राक्षसीचं प्रतीक म्हणून मातीच्या झोपड्यांचं दहन करतात. दुसऱ्या दिवसाला डोउल म्हणतात त्या दिवशी एकमेकांना रंग लावून तो दिवस साजरा करतात. बिहार आणि झारखंडमध्येही अशाच पद्धतीने होळी साजरी होते त्याला फागुवा म्हणतात. गोव्यातली उक्कुली (Ukkuli) गोव्यात होळीला उक्कुली म्हणतात आणि वसंतोत्सवाच्या स्वरूपात ती साजरी करतात. संपूर्ण महिनाभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. याला होळीचा शिमगो म्हणजे शिमगाही म्हणतात. गुजरातेतली धुलेती (Dhuleti) गोपाळकृष्ण मथुरेतल्या घरांत शिरून आपल्या मित्रांनी केलेल्या मानवी मनोऱ्यावर चढून उंच अडकवलेल्या लोण्याच्या माठातून लोणी चोरायचा ही त्याची बाललीला सर्वश्रुत आहे. त्याचीच आठवण म्हणून अहमदाबादमध्ये जागोजागी दहिहंडी बांधली जाते आणि तरुण मुलं ती फोडून त्यातलं ताक, दही, लोणी प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटतात अशी होळी गुजरातेत साजरी होते त्याला धुलेती म्हणतात. लठमार होळी (Lathmar Holi) लठमार म्हणजे काठीने मारणे. उत्तर प्रदेशात पत्नी आपल्या पतीला खेळ म्हणून काठीने मारतात आणि पती लाकडी ढालीनी स्वत:चा बचाव करतो. यालाही पौराणिक आधार आहे. जेव्हा श्रीकृष्ण आपली सर्वांत प्रिय भक्त राधेला भेटायला तिच्या गावी गेला होता तेव्हा तिथल्या गवळणी काठ्या घेऊन त्याच्या मागे लागल्या होत्या अशीही लीला श्रीकृष्ण चरित्रात वर्णिलेली आहे. त्याचीच आठवण जागवण्यासाठी ही लाठमार होळी साजरी होते. कर्नाटकातील बेदारा वेश (Bedara Vesha) कर्नाटकात होळीच्या आधी पाच दिवस पारंपरिक नृत्य करून होळीचा सण साजरा होतो त्याला बेदारा वेश म्हणतात. पंजाबमधील होल्ला मोहल्ला (Holla Mohalla) पंजाबात तीन दिवस होल्ला मोहल्ला हा सण होळीच्या वेळी साजरा केला जातो. यात निहंग शिखांना पारंपरिक युद्ध कला शिकवली जाते. दहावे शीख गुरू गोविंदसिंगांनी ही परंपरा सुरू केली. यानंतर होळी साजरी केली जाते. पश्चिम बंगालातील डोल जत्रा(Dol Jatra) पश्चिम बंगालमध्ये वसंतोत्सव म्हणून होळी साजरी केली जाते. श्रीराधाकृष्णाच्या मूर्तींची सजावट करून त्यांची एक मिरवणूक गावागावांतून काढली जाते. त्याला डोल जत्रा म्हणतात. राधा-कृष्णाच्या प्रेमाचा आनंद साजरा केला जातो. मणिपूरमधला याओसांग (Yaosang) मणिपूरमध्ये पाखांगबा या स्थानिक देवाची पूजा केली जाते आणि होळीसाठी वर्गणी काढून त्यातून होलिका राक्षसीचं प्रतीक म्हणून मातीच्या झोपड्या तयार करून त्यांचं दहन केलं जातं. त्यानंतर पाच दिवसांचा क्रीडा महोत्सव होतो त्याला याओसांग म्हणतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या