डायबेटीज (Diabetes) मोटॉबॉलिजम डिसऑर्डर आहे. एका रिसर्चनुसार जगात 52 कोटी लोकांना हा आजार आहे. या आजारात ब्लडशुगर नियंत्रणात राहत नाही. त्यामुळे त्याचे गंभीर आरोग्य परिणाम भोगावे लागतात.
नवी दिल्ली, 25 जुलै : डायबेटीस (Diabetes) अर्थात मधुमेह हा गंभीर स्वरूपाचा आणि गुंतागुंत निर्माण करणारा आजार (Disease) आहे. आज जगभरातले कोट्यवधी नागरिक डायबेटीसने ग्रस्त आहेत. डायबेटीसमध्ये ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) हा महत्त्वाचा घटक असतो. सातत्याने ब्लड शुगर वाढत राहिल्यास किडनी, डोळे, हृदयाशी संबंधित विकार होण्याची शक्यता वाढते. ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी रुग्णाला आपला आहार (Diet) अत्यंत काटेकोर ठेवावा लागतो. डायबेटीसच्या रुग्णांना गोड पदार्थ खाण्यावर मर्यादा असतात; पण त्यांची गोड खाण्याची इच्छा फळांच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते. फळं (Fruits) आरोग्यदायी असतात. यामुळे शरीराला पोषक घटकही मिळतात; पण डायबेटीसच्या रुग्णांनी काही ठरावीक फळं खाणं फायदेशीर ठरतं. `टीव्ही नाइन हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. डायबेटीस असलेल्या रुग्णांसाठी आहार आणि पुरेसा व्यायाम आवश्यक असतो. तसंच वजन नियंत्रणात ठेवणंदेखील गरजेचं असतं. आहारात पोषक पदार्थांचा समावेश आवश्यक असतो. अशा वेळी रुग्ण फळं आणि भाजीपाला सेवनावर अधिक भर देतात. आरोग्यविषयक तज्ज्ञांच्या मते, डायबेटीसच्या रुग्णांनी काही फळांचा आहारात आवर्जून समावेश करावा. ही फळं त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. यात प्रामुख्याने, ब्लॅकबेरी, सफरचंद, संत्री, खरबूज या फळांचा समावेश होतो. उन्हाळ्यात खरबूज (Melon) खाल्ल्याने शरीर हायड्रेटेड राहतं. त्यात अनेक पोषक घटक असतात. खरबुजात पोटॅशियम, व्हिटॅमिन बी, सी, मॅग्नेशियम आणि फायबर्स यांसारखे घटक असतात. डायबेटीसचे रुग्ण खरबुजाचं सेवन करू शकतात. अॅव्होकॅडो (Avocado) या फळात हेल्दी फॅट्स (Healthy Fats) असतात. तसंच व्हिटॅमिन, फायबर आणि मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात. या फळाच्या सेवनानं डायबेटीसची जोखीम कमी होऊ शकते. डायबेटीसच्या रुग्णांसाठी पपई (Papaya) हे फळं गुणकारी असतं. पपईत फ्लेव्होनॉइड्स आणि अॅंटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असतात. यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात येण्यास मदत होते. स्टार फ्रूट (Star Fruit) आंबड-गोड चवीचं फळ आहे. यामध्ये फायबर आणि व्हिटॅमिन सी यांचं प्रमाण चांगलं असतं. या फळात साखरेचं प्रमाण कमी असल्याने डायबेटीसच्या रुग्णांसाठी ते फायदेशीर ठरतं. किवी (Kiwi) या फळात अनेक पोषक घटक असतात. किवीत व्हिटॅमिन ई, के आणि पोटॅशियम असते. तसंच साखरेचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे डायबेटीसचे रुग्ण हे फळ अवश्य खाऊ शकतात. किवीमुळे डायबेटीस नियंत्रणात राहू शकतो. ब्लॅकबेरी (Blackberry) हे चविष्ट आणि आरोग्यदायी फळ आहे. ब्लॅकबेरीत अॅंटीऑक्सिडंट गुणधर्म आणि फायबर्स असतात. साखर मर्यादित प्रमाणात असते. त्यामुळे डायबेटीसचे रुग्ण ब्लड शुगर लेव्हलची चिंता न करता या फळाचा आस्वाद घेऊ शकतात. संत्र्यामध्ये (Orange) फायबर्स चांगल्या प्रमाणात असतात. संत्र्यात व्हिटॅमिन सी मुबलक असतं. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे डायबेटीसचे रुग्ण रोजच्या आहारात संत्र्याचा समावेश करू शकतात. सफरचंद (Apple) हे अतिशय चवदार आणि आरोग्यदायी फळ आहे. सफरचंदात फ्रुक्टोज असतं. सफरचंद खाल्ल्याने रक्तातल्या साखरेच्या पातळीवर अल्प प्रमाणात परिणाम होतो. या फळात फायबर्स सल्याने पचनक्रिया उत्तम राहते. एका अभ्यासानुसार, सफरचंदाचं प्रमाणात सेवन केल्यास टाइप 2 डायबेटीसचा (Diabetes Type-2) धोका कमी होऊ शकतो.