मुंबई, 23 मार्च : ब्रिटिशांच्या जुलुमी राजवटीविरुद्ध अखंड हिंदुस्थानातून आवाज उठत होता. प्रत्येक भारतीय आपापल्या परीने ब्रिटिशांना विरोध करत होता. काहींनी सत्याग्रहाचा मार्ग अवलबंला तर काहींनी क्रांतीचा. अशी क्रांतीची अखंड ज्योत संपूर्ण हिंदुस्थानच्या हृदयात चेतवून गेलेले हुतात्मे भगतसिंग (Bhagat Singh), राजगुरू (Rajguru) आणि सुखदेव (Sukhdev) हे अमर झाले आहेत. आज 23 मार्च 2021 हा त्यांचा स्मृतिदिन. आजपासून बरोबर 90 वर्षांपूर्वी याच दिवशी या तीन क्रांतिकारकांना ब्रिटिशांनी फाशी दिली होती. खरंतर या तिघांना फाशी देण्यासाठी ब्रिटिश सरकारने 24 मार्च हा दिवस निश्चित केला होता. पण 22 मार्चच्या रात्रीच ब्रिटिश सरकारने (British Government) या तिघांना फाशी देण्याची तयारी पूर्ण केली आणि लाहोर सेंट्रल जेलमध्ये (Lahore Central Jail) 23 मार्च 1931 ला फाशी देण्यात आली. नेमकं त्यादिवशी घडलं तरी काय होतं ही ब्रिटिशांनी ठरलेल्या वेळेच्या 11 तासांपूर्वीच या भारतीय क्रांतिवीरांना फाशी दिली? क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेवांनी 1928 मध्ये लाहोरमधील ब्रिटिश ज्युनिअर पोलीस अधिकारी जॉन साँडर्स (John Saunders) याची बंदुकीची गोळी घालून हत्या केली होती. या खटल्याच्या सुनवाणीसाठी तत्कालीन व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्विन यांनी विशेष ट्रायब्युनल तयार केलं होतं. त्याच ट्रायब्युनलने या तिघांना फाशीची शिक्षा सुनावली होती. पण या क्रांतिकारकांच्या कृत्यामुळे संपूर्ण देशात ब्रिटिशांविरुद्ध संतापाची लाट उसळली होती. त्या लाटेला घाबरून ब्रिटिश सरकारने निश्चित केलेल्या वेळेपूर्वी 11 तास फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली होती. हे वाचा - स्वातंत्र्यानंतरही अवहेलनाच, हुतात्मा राजगुरू यांचं स्मारक आजही दुर्लक्षित! भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांनीही कुठला गुन्हा केला नव्हता. भारतमातेला परदास्यातून सोडवण्यासाठी त्यांनी क्रांतीचा यज्ञ मांडला होता. या यज्ञाने भारतातील लक्षावधी मनं चेतली. त्यामुळे या तिघांना आपल्या कृत्याबद्दल सार्थ अभिमान होता. भगतसिंग तर लाहोरच्या तुरुंगात पुस्तक वाचायचे. वधस्तंभाकडे जाण्याआधी भगतसिंग लेनिनचं चरित्र (Lenin’s Biography) वाचत होते. जेव्हा जेलमधील अधिकारी त्यांना वधस्तंभाकडे न्यायला आले तेव्हा ते म्हणाले, ‘थांबा, पहिल्यांदा एका क्रांतिकारकाची दुसऱ्या क्रांतिकारकाशी भेट तरी होऊ दे.’ नंतर ते म्हणाले, ‘आता चला.’ आणि निर्भयपणे वधस्तंभाकडे गेले. हे तिघंही साखळदंडात जखडलेल्या अवस्थेत भारतमातेला परदास्यातून मुक्त करण्याची स्वप्न पाहत होते. भारतमातेसाठी बलिदान देण्याची संधी मिळत आहे या आनंदात हे तीनही वीर वधस्तंभाकडे निघाले होते. त्यांच्या मुखातून एकच गीत येत होतं, ‘ मेरा रंग दे बसन्ती चोला रंग दे, रंग दे बसन्ती चोला माए रंग दे.’ हे वाचा - वाढदिवशी कंगनाचा डबल धमाका! Thalaivi च्या ट्रेलरनंतर Tejas चा नवा लुकही जारी क्रांतिकारकांच्या या शौर्यातून अनेकांना प्रेरणा मिळाली. सरकारने या वीरांना थेट फाशीची शिक्षा सुनावल्यामुळे जनमानसातून झालेला विरोध ब्रिटिशांनी पाहिला. त्यांना लक्षात आलं की ही आग आपल्या साम्राज्याला भस्मसात करू शकते. त्यामुळे त्यांनी निश्चित तारखेच्या आधीच गुपचूप भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेवांना फाशी दिली.