केसांवर दही लावण्याचे दुष्परिणाम.
मुंबई, 27 ऑगस्ट : केसांचं सौंदर्य व्यक्तिमत्त्वात अनेक चांगले बदल घडवून आणतं. विशेषतः महिलांच्या व्यक्तिमत्त्वासाठी केसांची जपणूक महत्त्वाची असते. अभिनेत्री, मॉडेल, अँकर, सूत्रधार अशा क्षेत्रांमध्ये कौशल्यांसोबतच चांगलं दिसणंही महत्त्वाचं असतं. त्यामुळेच आपलं व्यक्तिमत्त्व खुलवण्यासाठी केसांची नियमित (Hair Care) काळजी घेतली पाहिजे. केस गळणं, निस्तेज केस, कोंडा, कोरडे केस या सगळ्यांवर घरातली एक सहज उपलब्ध गोष्ट रामबाण इलाज ठरू शकते, ते म्हणजे दही. आहारात ठरावीक प्रमाणात दही घेतलं तर त्याचे खूप चांगले परिणाम शरीरावर दिसतात. ते एक प्रोबायोटिक फूडही आहे. आतड्याचं काम चांगलं राहण्यासाठी त्याचा उपयोग होतो. शरीराप्रमाणेच केसांसाठीही दही अत्यंत उपयोगी (Benefits Of Curd For Hairs) आहे. हेअर मास्क तयार करताना त्यामध्ये दही घालू शकता किंवा नुसतंच दही केसांना लावलं तरी चालतं. दह्यामुळे केस मऊ होतात. त्यांना चमकही मिळते; मात्र दह्याचा अतिरेकी वापरही केसांसाठी घातक ठरू शकतो. त्यासाठीच केसांवर दह्याचे चांगले व वाईट परिणाम काय होऊ शकतात, हे पाहणं गरजेचं आहे. केसांसाठी कसं फायदेशीर ठरतं दही? - केसांवर दही लावल्यामुळे कोंडा कमी होतो. कोंडा कमी करण्यासाठी बाजारात अनेक वस्तू उपलब्ध आहेत; मात्र प्रत्येक व्यक्तीच्या केसांवर त्याचे परिणाम वेगवेगळे होऊ शकतात. त्यामुळे कोंडा घालवण्यासाठी दही वापरणं हिताचं ठरतं. दह्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. त्याचा फायदा कोंडा नाहीसा करण्यासाठी होतो. हे वाचा - Hair Care : कर्लिंग रॉडमुळे केस खराब होतायत? या सोप्या टिप्स वापरून केसांना करा नैसर्गिकरित्या कर्ल - दह्यामध्ये बायोटीन नावाचा घटक असतो. केसांच्या वाढीसाठी हा घटक गरजेचा असतो. त्यामुळे दह्याच्या वापरानं केसांची वाढ चांगली होते. केसांच्या आतली त्वचाही यामुळे चांगली राहते. - केस कोरडे झाले असतील, तर दही उत्तम पर्याय ठरतं. दही लावल्यामुळे केस मॉइश्चराइज व मऊ होतात. खराब केसांना संजीवनी देण्याचं काम दही करतं. दह्याचे केसावर दुष्परिणाम दही जास्त प्रमाणात वापरणं घातक ठरू शकतं. त्याच्या अॅसिडिक गुणधर्मामुळे केसांवर काही वेळा उलट परिणाम दिसू शकतात. डोक्यावर दाह होऊ शकतो. म्हणूनच संपूर्ण केसांवर किंवा डोक्यावर दही लावण्याआधी थोड्या भागावर (Patch Test) दही लावून त्याची तपासणी करा. दुग्धजन्य पदार्थांची अॅलर्जी असेल, तरीही दह्यामुळे त्रास (Side Effects Of Curd) होऊ शकतो. दह्याचा वापर जास्त केला, तर केस तेलकटही दिसू शकतात. त्यामुळे दह्याचा वापर करताना तो मर्यादित प्रमाणात व तपासणी करूनच करावा. हे वाचा - Tips for Hair Care : केसांचं नुकसान करतात ‘या’ सवयी; तुम्हालाही असेल अशी सवय तर लगेच करा बदल सामान्यपणे दही हा आहारातला घटक असल्यानं त्याचे फारसे दुष्परिणाम होत नाहीत; मात्र दह्यामुळे जळजळ किंवा अॅलर्जी उद्भवल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्यावं.