नवी दिल्ली, 07 एप्रिल: ब्रेन स्ट्रोक (Brain Stroke) किंवा ब्रेन हॅमरेजचा (Brain Hemorrhage) धोका आता ज्येष्ठ नागरिकांपुरता मर्यादित राहिला नसून त्याची व्याप्ती तरुणांमध्येदेखील वाढत आहे. दर वर्षी जगभरातील लाखो तरुण या आजारानं मृत्युमुखी पडत आहेत. एकट्या अमेरिकेत दर वर्षी 40 वर्षापेक्षा कमी वयाचे तब्बल 70 हजार तरुण या आजाराचे बळी ठरत आहेत. यावरून या आजाराचा धोका किती वाढत चालला आहे याची सहज कल्पना येते. याआधी तरुण वयात या आजाराने मृत्यू होण्याचे प्रमाण अगदी कमी होते. वृद्ध लोकामध्ये या आजाराचे प्रमाण अधिक दिसून येत असे. आता मात्र बदलती जीवनशैली, ताण तणाव यामुळे तरुण वयातच हा आजार होण्याचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे दिसत आहे. यासाठी तरुणांनी वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे. ब्रेन स्ट्रोक म्हणजे काय? जेव्हा ब्रेन अर्थात मेंदूची एखादी नस अचानक ब्लॉक होते किंवा फाटते त्याला ब्रेन स्ट्रोक म्हणतात. अशावेळी मेंदूचा रक्तपुरवठा थांबतो आणि मेंदूच्या कार्यावर त्याचा परिणाम होतो. ब्रेन स्ट्रोक कधीही, केव्हाही होऊ शकतो, मात्र बहुतांश घटना पहाटेच्या वेळेस घडलेल्या आढळतात. ब्रेन स्ट्रोक आणि ब्रेन हॅमरेज यात फरक काय ? ब्रेन हॅमरेज हा ब्रेन स्ट्रोकचाच एक प्रकार आहे. जेव्हा मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या रक्ताचा पुरवठा कमी करू लागतात तेव्हा ट्रासिएट एस्केमिक स्ट्रोक म्हणतात. जेव्हा या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात तेव्हा याला एस्केमिक स्ट्रोक म्हटलं जातं. मात्र जेव्हा या रक्तवाहिन्या फाटतात तेव्हा त्याला ब्रेन हॅमरेज म्हटलं जातं. (हे वाचा- कोरोनाविरोधातील लढ्यात चिम्पाझीची मोठी भूमिका; त्याची विष्ठा करतेय तुमचा बचाव ) तरुण वर्गात याचा धोका कोणाला अधिक आहे ? - तरुणपिढीत ज्यांना ब्लड क्लॉट होण्याची समस्या आहे त्यांना एक्सेमिक स्ट्रोक येण्याची शक्यता अधिक असते. - ज्यांच्या ह्रदयाला जन्मतः भोक आहे आणि जन्मानंतर काहीच महिन्यात ते बंद करण्यात आलं नसेल तर या लोकांना ब्रेन स्ट्रोकचा धोका अधिक असतो. - ज्यांच्या रक्तवाहिन्या कमजोर असतात त्यामध्ये सतत बुडबुडे निर्माण होत असतात त्यांनाही ब्रेन स्ट्रोकचा धोका अधिक असतो. - पॉलिसिस्टीक किडनी डिसीजमुळेही अनेक तरुणांमध्ये ब्रेन स्ट्रोकचा धोका संभवतो. - तीव्र डोकेदुखीच्या मायग्रेन या आजाराने त्रस्त असणाऱ्या लोकांनाही ब्रेन स्ट्रोकचा धोका असतो. ज्या महिलांना मायग्रेनचा आजार आहे त्यांनी गर्भनिरोधक गोळ्या घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.