शिवसेना-भाजप युती? भाजपच्या मुख्य प्रवक्त्यांनी घेतली संजय राऊत यांची गुप्त भेट, राजकीय चर्चांना उधाण
पणजी, 12 फेब्रुवारी : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची (5 state assembly election) रणधुमाळी सुरू आहे. तर येत्या काळात मुंबईसह राज्यातील इतरही मनपा निवडणुका होणार आहेत. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी (BMC Election 2022) एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. भाजपच्या (BJP) मुख्य प्रवक्त्यांनी चक्क शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गुप्त भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. (BJP Chief Spokesperson secret meeting with Shiv Sena leader Sanjay Raut in Goa) भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांची गुप्त भेट घेतली आहे. पणजीमधील मँरिएट हाँटेलमध्ये केशव उपाध्ये आणि संजय राऊत यांच्यात गुप्त भेट झाली आहे. शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये झालेल्या या गुप्त भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. गोवा विधानसभा निवडणुक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या राजकीय भेटीमुळे गोव्यातील राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. पुन्हा युती? चर्चांना उधाण 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजप यांची युती तुटली. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत घरोबा करत राज्यात सत्ता स्थापन केली. तेव्हापासून शिवसेना आणि भाजप नेते एकमेकांवर वारंवार टीका करताना दिसतात. मात्र, आता आगामी निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये झालेल्या या गुप्तभेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. वाचा : विधान परिषदेचे सभापती राज्यपालांसमोर राष्ट्रपतींकडे राज्यपालांचीच तक्रार करणार? गोव्यात लोकसभा निवडणुकही लढवणार गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनाही उतरली आहे. शिवसेनेने येथे आपले 11 उमेदवार उभे केले आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना अकरा जागा लढत आहे. आज शिवसेनेचा गोवा निवडणुकीचा जाहीरनामा आदित्य ठाकरे यांच्या हस्ते जाहीर होणार आहे. विधानसभा निवडणूक संपल्यावर गोव्यात आम्ही लोकसभेची तयारी सुरू करणार आहोत. दोन्ही जागा शिवसेना लढवणार आहे अशी माहिती कालच संजय राऊत यांनी दिली. आमची तयारी काय आहे हे विरोधक सांगू शकतील. गोवा विधानसभा निवडणुकीत निवडून आलो तर सरकारमध्ये सहभागी होऊ, आमचे आमदार निवडून येणं महत्वाचे आहे असंही संजय राऊत म्हणाले होते. भाजप 40 पैकी 42 जागा जिंकणार गोवा विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा आपणच जिंकणार असल्याचा दावा भाजपने केला आहे. यावर संजय राऊत यांनी म्हटलं, सर्वांनाच वाटतं की बहुमत आपल्याला मिळणार आहे. आत्मविश्वास चांगला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा केरळ आणि पश्चिम बंगालमध्येही झाल्या, तेथे पाहिलं काय झालं ते. देवेंद्र फडणवीस बोलतात ते बरोबर बोलतात, मी तर बोलतो 40 पैकी 42 जागा भाजप जिंकेल असं म्हणत काल संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला.