निकोसिया, 10 जानेवारी : जगभरात सध्या कोरोना विषाणूच्या (Coronavirus Pandemic) तिसऱ्या लाटेनं (Corona Third Wave) हाहाकार माजवला आहे. ओमिक्रॉन (Omicron) या अत्यंत वेगानं संसर्ग पसरवणाऱ्या नव्या प्रकारामुळे ही साथ आली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या एका दिवसात हजारोंच्या संख्येनं वाढत असून, सर्वत्र चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. या चिंतेच्या सावटात आणखी भर पडली आहे ती डेल्टाक्रॉनमुळे (Deltacron). सायप्रस युनिव्हर्सिटीतले (Cyprus University) जीवशास्त्राचे प्राध्यापक आणि बायोटेक्नॉलॉजी, मॉलिक्युलर व्हायरॉलॉजी प्रयोगशाळेचे प्रमुख लिओनडिओस कोस्ट्रिकिस यांनी ब्लूमबर्गला दिलेल्या निवेदनात डेल्टा जीनोममध्ये ओमिक्रॉनसारखे आनुवंशिक गुणधर्म असणारा विषाणूचा नवा प्रकार सापडल्याचा दावा केला आहे. 25 रुग्णांच्या नमुन्यांच्या विश्लेषणानंतर हा निष्कर्ष काढल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सायप्रसमध्ये आढळलेल्या डेल्टाक्रॉनच्या (Deltacron) 25 रुग्णांपैकी 11 जण हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत, तर 14 जण घरीच उपचार घेत आहेत. डेल्टा आणि ओमिक्रॉनचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले असून, त्यांच्या शरीरात हा नव्या प्रकाराचा विषाणू आढळल्याचं एका मुलाखतीतही कोस्ट्रिकिस यांनी नमूद केलं आहे. एकाच वेळी सीझनल फ्लू आणि कोविड-19 हे दोन्ही आजार झाल्यासारखा हा प्रकार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे; मात्र एकाच वेळी कोरोना विषाणूच्या दोन प्रकारांची लागण होणं अत्यंत दुर्मीळ आहे, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. या प्रकाराचा संसर्ग वाढेल किंवा या साथीवर त्याचा काय परिणाम होईल, हे आताच सांगणं कठीण आहे. डेल्टाक्रॉन अधिक पॅथॉलॉजिकल (Pathalogical) किंवा अधिक सांसर्गिक आहे की नाही हे भविष्यात ठरवू असंही कोस्ट्रिकिस यांनी म्हटलं आहे. त्यांच्या मते वेगानं संसर्ग पसरवणारा ओमिक्रॉन डेल्टाक्रॉनशी स्पर्धा करू शकणार नाही. 7 जानेवारी रोजी 25 डेल्टाक्रॉन नमुन्यांचे सिक्वेन्सेस GISAID या विषाणूमधल्या बदलांचा मागोवा घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय डेटाबेसकडे (International Database) पाठवण्यात आले असल्याचं कोस्ट्रिकिस यांनी स्पष्ट केलं आहे. हे वाचा - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा शेवट कधी? राजेश टोपेंनी दिली दिलासादायक माहिती 1.2 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या सायप्रसमध्ये आतापर्यंत 2 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना कोविड-19 ची लागण झाली असून, 700 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या नवीन प्रकारामुळे चिंतेचं कारण नाही, असं सायप्रसच्या आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तर काही तज्ज्ञांनी मात्र असा संयुक्त प्रकार असलेला विषाणू असणं शक्य नसल्याचा दावा करून हा प्रयोगशाळेतल्या गफलतीचा परिणाम असल्याचं मत व्यक्त केलं आहे. जागतिक आरोग्य संघटना काय म्हणतेय? दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) अद्याप डेल्टाक्रॉनला दुजोरा दिलेला नाही. तसंच, जगभरातल्या अन्य देशांतल्या तज्ज्ञांनीही याला दुजोरा दिलेला नाही. अनेक तज्ज्ञांच्या मते हा प्रयोगशाळेत दोन नमुने एकत्र झाल्यामुळे घडलेला प्रकार असावा. इम्पिरियल कॉलेज ऑफ लंडनमधले व्हायरोलॉजिस्ट टीम पीकॉक (Team Peacock) यांनी ट्विटद्वारे सांगितलं, की डेल्टाक्रॉन असा कोणताही नवीन विषाणू प्रकार नसून हा दोन नमुने एकत्र झाल्याचा परिणाम आहे. जेव्हा विषाणूचे नवीन प्रकार सिक्वेन्सिंगसाठी प्रयोगशाळेत येतात, तेव्हा असा प्रकार होणं सहज शक्य आहे; मात्र असे प्रकार माध्यमांपार्यंत पोहोचत नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्या आणि संसर्गजन्य आजारतज्ज्ञ डॉ. कृतिका कुप्पाली यांनीही डेल्टाक्रॉन असा काही नवा प्रकार निर्माण होण्याची शक्यता फेटाळून लावली असून, डेल्टा आणि ओमिक्रॉनचे नमुने एकत्र झाल्यानं हा नवीन प्रकार तयार झाल्याचं या प्रयोगशाळेतल्या संशोधकांना वाटलं असावं असं म्हटलं आहे. संसर्गजन्य आजारांची नावं एकत्र करून नवीन काही आजार तयार करू नयेत, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. स्क्रिप्स रिसर्च ट्रान्सलेशनल इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. एरिक टोपोल यांनी यांनीही याला दुजोरा दिला असून, याला ‘स्कॅरियंट’ (Scriant) असं संबोधून, डेल्टाक्रॉन असा कोणताही नवा प्रकार नाही; मात्र या शब्दामुळे विनाकारण सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण होत आहे, असं म्हटलं आहे. डॉ. बोगुहामा काबिसेन तितानजी यांनीही नवीन विषाणू प्रकार आल्याचा निष्कर्ष काढण्याची घाई करू नये असं म्हटलं आहे. सध्या मिळालेल्या माहितीवरून हा प्रकार दोन नमुने एकत्र झाल्यामुळं घडल्याचं दिसत आहे. त्यामुळे काळजी घ्यावी पण भीती बाळगू नये असं नमूद केलं आहे. त्याचप्रमाणे सध्या फ्लोरोना (Florona), डेल्मिक्रॉन (Delmicron), फ्लुरोना (Flurona) अशी नावंही सतत चर्चेत असून यामुळे निरनिराळ्या अफवा पसरत आहेत. डेल्टा आणि ओमिक्रॉन यांच्या संमिश्र प्रकाराला डेल्मिक्रॉन, तर फ्ल्यू आणि कोविड-19 असे दोन्ही आजार एकाचवेळी झाल्याचं आढळल्यास फ्लुरोना किंवा फ्लोरोना असं संबोधन रूढ होत आहे. हे वाचा - …तर कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्यांची टेस्ट करण्याची गरज नाही - मोदी सरकार डेल्टाक्रॉन खरा की लॅबमधील चुकीचा परिणाम? आपल्याला आढळलेले निष्कर्ष डेल्टाक्रॉन हा प्रयोगशाळेतल्या (Lab) तांत्रिक त्रुटीचा परिणाम असल्याचा दावा चुकीचा ठरवतात, असा ठाम दावा कोस्ट्रिकिस यांनी केला आहे. जुन्या विषाणूमध्ये अनेक म्युटेशन्स होऊन जो नवीन प्रकार निर्माण झाला आहे, तो केवळ एका रीकॉम्बिनेशनचा परिणाम नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. कोविड-19 साठी रुग्णालयात दाखल नसलेल्या रुग्णांपेक्षा रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांमध्ये डेल्टाक्रॉनचा संसर्ग अधिक आहे. यावरूनही नमुने एकत्रित होण्याचं गृहीतक चुकीचं ठरतं, असंही त्यांनी नमूद केलं आहे. जागतिक डेटाबेसमध्ये जमा केलेला इस्रायलचा किमान एक क्रम डेल्टाक्रॉनची आनुवंशिक वैशिष्ट्यं दाखवतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. रीकॉम्बिनेशन (Recombination) म्हणजे नेमकं काय हे लक्षात घेणं आवश्यक आहे. डेल्टाक्रॉनसारखा नवीन विषाणू प्रकार निर्माण होण्यासाठी दोन वेगवेगळ्या विषाणूंचे जेनेटिक कोड एकमेकांत मिसळण्याची प्रक्रिया म्हणजेच रीकॉम्बिनेशनची प्रक्रिया होणं गरजेचं आहे. त्याकरिता सार्स सीओव्ही 2 (SARS Cov -2) यासारखी एक क्रांतिकारी सुपरपॉवर विषाणूकडे असणं आवश्यक आहे. त्यामुळे दोन वेगवेगळी वैशिष्ट्यं असलेले विषाणू त्यांचे जीनोम्स परस्परांत मिसळून टाकतील. सर्वसाधारणपणे विषाणू स्वतःच्या वैशिष्ट्यात बदल करून आपलं नवीन रूप तयार करतो, तेव्हा एकावेळी एक बदल होतो; पण रीकॉम्बिनेशनमुळे एकाच वेळी अनेक बदल घडून येऊ शकतात. ब्रिटन आणि कॅलिफोर्नियामध्ये फेब्रुवारी 2021मध्ये आढळलेल्या दोन वेगवेगळ्या विषाणू प्रकारांचा संदर्भ देऊन, एकाच व्यक्तीला दोन वेगवेगळ्या विषाणूंचा संसर्ग झाल्यास रीकॉम्बिनेशनद्वारे हायब्रीड विषाणू तयार होणं शक्य असल्याचं म्हटलं जात आहे. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीचा नमुना तपासणीसाठी घेतल्यानंतरही त्यात नवीन विषाणूची निर्मिती होऊ शकते. त्या व्यक्तीच्या शरीरात तसा संमिश्र विषाणू असेल असं नाही, असंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे. कोरोना विषाणूच्या साथीला सुरुवात झाल्यापासून संशोधक रीकॉम्बिनेशनवर लक्ष ठेवून आहेत. हे वाचा - मुंबईकरांना दिलासा, कोरोनाची नवी आकडेवारी समोर,रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले काही आठवडे किंवा महिने दोन विषाणू परस्पर संपर्कात आले तरच त्यातून नवीन प्रकार निर्माण होतो, असं सांगून टीम पिकॉक यांनी या गृहीतकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. डेल्टा अधिक संसर्गजन्य होता. त्यापेक्षा ओमिक्रॉन अधिक संसर्गजन्य आहे. ओमिक्रॉनमध्ये डेल्टामधले काय गुणधर्म आहेत, असा प्रश्न येतो, असं डॉ. तितानजी यांनी म्हटलं आहे. सार्स सीओव्ही 2ची संसर्गक्षमता नेहमीच अधिक होती. त्यामुळे रीकॉम्बिनेशन झाल्यास संसर्ग अधिक वाढेल; मात्र यामुळे नवीन अधिक घातक विषाणू प्रकार निर्माण होतील, असं सांगणं कठीण आहे, असं डॉ. तितानजी यांनी नमूद केलं आहे.