ज्युनिअर नाना पाटेकरनं केला आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई, 14 जून : द कपिल शर्मा शोमध्येमधील कलाकार प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन करत असतात. याच शोमधून आपल्या विनोदाचे चौकार षट्कार लावणारा अभिनेता तीर्थानंद याने फेसबुक लाइव्ह करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हातात फिनाइलची बाटली घेऊन फिनाइल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान फेसबुक लाईव्ह पाहत असलेल्या काही मित्रांनी जवळच्या पोलीस स्थानकात फोन करून पोलिसांना तीर्थानंदच्या घरी पाठवलं. कॉल येताच पोलिसांनी त्वरित तीर्थानंदचं घर गाठलं. तोवर त्यानं फिनाइल प्यायलं होतं. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस हवलदार मोरे यांनी आजतकला दिलेल्या माहितीनुसार, कॉल येताच पोलीस मीरा रोड येथील शांती नगर येथील बी 21 बिल्डिंगच्या फ्लॅट नंबर 703मध्ये पोहोचले. फ्लॅटचा दरवाजा उघडा होता आणि घरात एक पाळीव कुत्रा होता. आम्ही आवाज दिला तेव्हा अभिनेता तीर्थानंद अर्ध्या बेशुद्ध अवस्थेत होता. त्यांना आम्ही त्वरित रुग्णालयात दाखल केलं. हेही वाचा - बोल्ड सीन्सची हद्द पार; थिएटरमधून बॅन झाले हे सिनेमे, एकट्यात असताना या OTTवर पाहू शकता
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता तीर्थानंदननं त्याच्या या परिस्थितीला एका महिलेला जबाबदार धरलं आहे. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांआधी माझी एका महिलेबरोबर ओळख झाली होती. तिला दोन मुली होत्या. आम्ही लिव्ह-इनमध्ये राहत होते. एकत्र राहत असताना मला कळलं की ती वेश्याव्यवसाय करते. त्यामुळे मला तिच्यापासून सुटका मिळवायची होती. ती महिला मला धमकावत होती. तिने माझ्यावर केसही केली होती. त्या केसमुळे मी कित्येक दिवस माझ्या घरापासून दूर पळत होतो. मी अनेक दिवस माझ्या घरी गेलो नाहीये. तिने मला रस्त्यावर झोपण्यासाठी मजबूर केलं. या सगळ्याला मी वैतागलो आणि म्हणून स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला.
अभिनेता तीर्थानंद सिने इंडस्ट्रीतील ज्युनिअर नाना पाटेकर म्हणून ओळखला जात होता. सोशल मीडियावर त्याचं ऑफिशअल नावही ज्युनिअर नाना पाटेकर असं आहे. अनेकदा त्याने नाना पाटेकर यांच्या बॉडी डबलचंही काम केलं आहे. तीर्थानंद द कपिल शर्मा शोमध्ये देखील अनेकदा दिसला आहे. जानेवारी महिन्यात त्यानं अभिषेक बच्चनबरोबर एक सिनेमा शुट केला आहे. त्याचप्रमाणे फेब्रुवारी महिन्यात वाघले की दुनिया मालिकेच्या 1-2 एपिसोडमध्येही त्याने काम केलं. परंतु मार्च महिन्यापासून त्याच्या हाताला काम नव्हतं. त्यात त्याला दारू पिण्याचंही व्यसन लागलं होतं. तीर्थानंदनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्याची ही पहिली वेळ नव्हती. याआधी 27 डिसेंबर 2021मध्ये त्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा कोविडमुळे काम मिळत नसल्यानं त्याने असं केलं होतं. तेव्हा शेजाऱ्यांनी त्यांला त्वरित रुग्णालयात नेऊन त्याचा जीव वाचवला होता.