नवी दिल्ली, 23 मे : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेतील कलाकारही घराघरांत पोहोचले आहेत. या मालिकेतील कोणत्याही कलाकाराने मालिका सोडल्याचं समजलं की फॅन्स नाराज होतात. आताही या शोच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. या मालिकेत तारक मेहताची प्रमुख भूमिका करणारे अभिनेते शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांनी ही मालिका सोडल्याची बातमी होती. त्यामुळे प्रेक्षक नाराज झालेच होते. त्यातच आता या मालिकेतील आणखी एक लोकप्रिय पात्र बबिताजी म्हणजेच मुनमुन दत्ताही (Munmun Dutta) मालिका सोडत असल्याची माहिती आहे. शैलेश लोढा यांचे प्रोड्युसरसोबत मतभेद झाल्याने ते शोमधून बाहेर पडल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. मात्र आतापर्यंत प्रोड्युसर किंवा शैलेश लोढा यांच्यापैकी कुणीही याबद्दल प्रतिक्रिया दिलेली नाही. पण शैलेश लोढा आता शेमारु टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या ‘वाह भाई वाह’ मालिकेमध्ये दिसणार आहेत. या शो च्या टीझरची सध्या जोरदार चर्चा आहे. शैलेश लोढांनंतर आता मुनमुन दत्ताही शोमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. याआधीही मुनमुन शोमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा झाली होती. मात्र त्यावेळेस या सगळ्या अफवा असल्याचं मुनमुननं स्पष्ट केलं होतं. आता मात्र ‘बिग बॉस ओटीटी सीझन 2’ (Big Boss OTT Season 2) च्या मेकर्सनं मुनमुनशी संपर्क केल्याचं वृत्त आहे.
मुनमुन म्हणजेच ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या शोमधील बबिताजी या पात्राचं प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. त्यामुळे तिनं शो सोडला तर अर्थातच प्रेक्षक नाराज होतील यात शंका नाही. सध्या ‘बिग बॉस ओटीटी सीझन 2’ (Big Boss OTT Season 2) साठी स्पर्धकांचा शोध सुरु आहे. मुनमुन या शो मध्ये असेल का याबाबत अजूनतरी अधिकृतरित्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण ही चर्चा मात्र जोरदार सुरू आहे. या पूर्वी मुनमुन दत्ता ‘बिग बॉस 15’ मध्ये दिसली होती. तेव्हा ती एका चॅलेंजरच्या रूपात या शोमध्ये सहभागी झाली होती. सुरभि चंदना, विशाल पुरी आणि आकांक्षा पुरीसोबत मुनमुन ‘टिकट टू फिनाले’ या टास्कच्या दरम्यान सहभागी झाली होती. मुनमुननं आणखीही बऱ्याच शोमध्ये काम केलं आहे. पण ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील बबिताजीच्या भूमिकेनं तिला सर्वाधिक लोकप्रियता मिळवून दिली आहे. आता मुनमुन या शोमधून खरंच बाहेर पडणार का हे काही दिवसांतच स्पष्ट होईल.