सुनील शेट्टी
मुंबई, 18 जुलै : गेल्या काही काळापासून टोमॅटोच्या वाढत्या भावाची सगळीकडेच चर्चा आहे. पण त्याचबरोबर अधिक चर्चा रंगली ती सुनील शेट्टीच्या टोमॅटो बद्दल केलेल्या विधानाची. वाढत्या किमती सर्वसामान्यांनाच त्रास देतात असे नाही. तर, श्रीमंत कलाकार देखील याबद्दल चिंतेत असतात. आपल्या घराचं बजेट सांभाळणारे सुनील शेट्टी देखील टोमॅटोच्या किमतीमुळे हैराण झाले होते. त्याने टोमॅटोचा वाढता भाव पाहून ही फळभाजी थेट खाणंच सोडून दिलं. सुनील शेट्टी यांनी टोमॅटोबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले आहे. याच कारणामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आता ट्रोलिंगला कंटाळलेल्या अभिनेत्याने आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. सुनील शेट्टी त्याच्या फिटनेसबाबत खूप जागरूक आहे. वयाच्या साठीतही त्याची तब्येत एखाद्या तरुणाला लाजवेल अशीच आहे. व्यायामासोबतच सुनील शेट्टी आपलं डाएट देखील सांभाळतात. अशा परिस्थितीत घरात कोणत्या प्रकारची फळे आणि भाज्या येत आहेत याचीही ते पुरेपूर काळजी घेतात. नुकतेच सुनीलने सांगितले की, ‘आमच्या घरी बहुतेक ताज्या भाज्या येतात. आजकाल टोमॅटोचे भाव वाढले आहेत, त्यामुळे आम्ही त्याचे प्रमाण कमी केले आहे. लोकांना वाटेल की याने सेलिब्रिटींना काय फरक पडेल पण तसे नाही. आम्हालाही या गोष्टींचा सामना करावा लागतो.’ असं मत त्याने व्यक्त केलं होतं. यानंतर त्यांच्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला होता.
अभिनेत्याचे वक्तव्य व्हायरल होताच अनेक शेतकऱ्यांनी त्याचा निषेध केला. इतकंच नाही तर एका वृत्तानुसार, सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी संतोष मुंडे यांनी अभिनेत्यावर टीका केली आणि त्याला विरोध करत सुनीलच्या घरी टोमॅटोही पाठवले. या सर्व गोष्टींचा अण्णांना मोठा धक्का बसला आहे. ‘अच्छे दिन थे यार…’ अमिताभ बच्चन यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत; चाहत्यांनी जोडला थेट मोदींशी संबंध एका रिपोर्टनुसार सुनील शेट्टीने आता शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. ते म्हणाले, ‘माझा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे. मी त्यांच्याबद्दल नकारात्मक धारणा बाळगण्याचा विचारही करू शकत नाही. त्यांच्या पाठिंब्याने मी नेहमीच काम केले आहे. आम्ही आमच्या स्वदेशी उत्पादनांचा प्रचार करावा अशी माझी इच्छा आहे. त्याचा लाभ आपल्या शेतकऱ्यांना नेहमी मिळावा अशी माझी इच्छा आहे.’ सुनील शेट्टी पुढे म्हणाला, ‘शेतकरी हा माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. हॉटेलवाले या नात्याने माझे त्यांच्याशी नेहमीच थेट संबंध राहिले आहेत. माझ्या कोणत्याही विधानाने, जे मी बोललोही नाही, त्यांना दुखावले असेल तर मी मनापासून माफी मागतो. त्यांच्या विरोधात बोलण्याचे स्वप्नही मी पाहू शकत नाही. कृपया माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावू नका.’ असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. सुनील शेट्टीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता लवकरच ‘हेरा फेरी 3’ मध्ये पुन्हा एकदा श्यामची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि परेश रावल देखील दिसणार आहेत. याशिवाय सुनील शेट्टीने अलीकडेच ‘आहार - असोसिएशन हॉटेल अँड रेस्टॉरंट’च्या सहकार्याने त्यांचे फूड डिलिव्हरी अॅप लाँच केले आहे.