मुंबई 13 ऑगस्ट : अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) म्हणजे बॉलिवूमधील एक दिग्गज अभिनत्रींपैकी एक. त्यांच्या नावासमोर अनेक सुपरहिट चित्रपटांची रांग लागते. एक अशी अभिनेत्री जिने केवळ बॉलिवूच नाही तर तमिळ, तेलुगू , मल्याळम, कन्नड अशा अनेक भाषेतील चित्रपटांत काम केलं. आज श्रीदेवींचा जन्मदिवस, त्यानिमित्त जाणून घ्या बॉलिवूडच्या चांदणीविषयी खास गोष्टी. श्रीदेवी यांचा जन्म 13 ऑगस्ट 1963 ला शिवाकाशी, तमिळनाडूत झाला होता. त्यावेळी त्यांचं नाव श्रीअम्मा यंगेर अय्यपन होतं. श्रीदेवी यांची मातृभाषा तमिळ आहे. त्यांचे वडील एक वकील होते तर आईचं नाव राजेश्वरी होतं. त्यांना दोन सावत्र भाऊ तर एक सख्खी बहीण आहे. श्रीदेवींनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी एक बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. त्यांचा पहिला चित्रपट ‘थुनाईवन’ हा होता. ‘हिम्मतवाला’ हा त्यांना बॉलिवूडमध्ये ओळक निर्माण करूण देणारा चित्रपट होता. त्यात त्यांच्यासोबत जितेंद्र देखील होते. चित्रपटांप्रमाणेच श्रीदेवी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत राहिल्या. श्रीदेवी आणि अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांच्या अफेअरची तुफान चर्चा होती. इतकच नाही त्यांनी गुपचूप लग्न केल्याची चर्चा त्यावेळी फार रंगली होती. पण मिथुन चक्रवर्ती आधीच विवाहित होते. यामुळे त्यांच्या विवाहित जीवनावर याचा परिणाम होऊ लागला होता. त्यानंतर मिथुन यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन श्रीदेवी आणि त्यांच्या नात्याविषयी स्पष्टीकरण दिलं होतं. त्यानंतर श्रीदेवी यांच्या आयुष्यात बोनी कपूर (Boney Kapoor) आले. प्रसिद्ध दिग्दर्शक अशी त्यांची ओळख होती. मैत्री , प्रेम ते अफेअर असा त्यांचा मोठा प्रवास होता मात्र त्यात त्यांना अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागलं होतं. श्रीदेवींच्या आईलाही बोनी कपूर पसंत नसल्याचं म्हटलं जातं. 1996 साली दोघांनी विवाह केला. त्यासाठी त्यांना पहिल्या पत्नीला अंतर दिलं होतं.