नवी दिल्ली 25 मे : विवाहित जोडप्याला घटस्फोट घ्यायला लागणं ही खरोखरच खूप वेदनादायक बाब असते. त्यामुळे कुणाच्याही आयुष्यात असा प्रसंग येऊ नये अशीच प्रार्थन सगळे करतात. त्यात जर त्या जोडप्याला मुलं असतील तर त्यांचे जे हाल होतात ते दुसरा कुणीच समजून घेऊ शकत नाही. त्या मुलांना काय वाटत असेल हे तिच जाणतात. हे सांगण्याचं कारण असं, की सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रुती हासनने (Shruti Haasan) तिचे वडील ज्येष्ठ अभिनेते कमल हासन (kamal Haasan) आणि आई ज्येष्ठ अभिनेत्री सारिका (Sarika) यांच्या संबंधांबदद्ल जाहीर मत व्यक्त केलं आहे. या कलाकार जोडप्यानी 1988 मध्ये लग्न केलं आणि 2004 मध्ये त्यांनी घटस्फोट (Divorce) घेतला. त्यावेळी श्रुती तरुण होती आणि अक्षरा ही लहानच होती. त्यांनी त्यावेळी वेगळं होण्याचा निर्णय घेतला हे चांगलंच झालं, असं मत श्रुती हासनने सोशल मीडियावर व्यक्त केलं आहे. यासंबंधीचं वृत्त आजतकने दिलं आहे. श्रुती ही दक्षिणेतल्या इंडस्ट्रीतली सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. तसंच तिनं हिंदीतही अनेक चित्रपटांत काम केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. ती सारखे अपडेट (Updates) टाकते असं नाही पण इथं ती खासगी आयुष्याबद्दल बऱ्याच गोष्टी शेअर करते. तसंच तिनं आपल्या आई-वडिलांच्या घटस्फोटाबद्दल नुकतंच आपलं मत व्यक्त केलं आहे. ती म्हणते, ‘ माझ्या आईवडिलांनी 16 वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला ते चांगलंच झालं. ते दोघंही वेगवेगळ्या व्यक्ती म्हणून खूप उत्तम आहेत. ते दोघं अनेक वर्षं एकत्र राहिले. जर दोन व्यक्ती एकत्र आनंदात राहू शकत नसतील तर ओढून-ताणून एकत्र राहण्यात काही अर्थ नाही. त्यापेक्षा वेगवेगळं राहून ते आनंदात राहू शकतात. त्यांनी तो निर्णय घेतला तेव्हा मी तरुण होते. मला जुळवून घेणं थोडं कठीण गेलं पण आता वाटतं ते तेव्हा एकत्र राहून आनंदात राहणं शक्य नव्हतं. तर त्यांनी योग्य निर्णय (Correct Decision) घेतला. माझं बाबांशी चांगलं जमतं. आई पण माझी काळजी घेते पण जे झालं ते हिताचंच झालं.’ श्रुती हासन सध्या अनेक गोष्टी स्पष्टपणे सांगते. त्यामुळे चाहत्यांना ते खूप आवडतं. ती सध्या घरातच आहे आणि तिनं घरातील एका भागात स्टुडिओ तयार करून घेतला आहे. त्यात ती तिच्या सध्याच्या चित्रपटांचं शूटिंग (Shooting) करते आहे. तिने घरात राहून सुरक्षित राहाण्याचं आवाहन सर्वांना केलं आहे.