शरद केळकर
मुंबई, 30 नोव्हेंबर : मराठमोळे दिग्दर्शक ओम राऊत यांचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट गेल्या दीड महिन्यांपासून चर्चेत आहे. त्याचा टीझर रिलीज झाल्यापासून तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अनेकांनी चित्रपटाच्या व्हीएफएक्सकडे बोट दाखवले, यात राम आणि रावणाच्या व्यक्तिरेखांविषयी अनेकांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. पण एका गोष्टीसाठी प्रेक्षक कायमच आनंदी आणि सकारात्मक भूमिकेत होते ती गोष्ट म्हणजे प्रभासचा हिंदीतील आवाज. हा आवाज प्रभासचा नसून हा मराठमोळ्या शरद केळकर चा दमदार आवाज आहे. हा आवाज प्रेक्षकांना कायमच सुखावतो. आता या आवाजाच्या मागच्या भूमिकेविषयी शरद केळकरने मोठा खुलासा केला आहे. ‘आदिपुरुष’ या चित्रपटात प्रभास भगवान प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रभासच्या हिंदी भूमिकेसाठी शरद केळकरने आवाज दिला आहे. आता या भूमिकेविषयी शरद स्वतःला भाग्यवान समजतो. नुकतंच हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत याविषयी बोलताना शरद म्हणाला की, ‘‘या चित्रपटात चक्क प्रभू श्रीरामना आवाज द्यायला मिळाल्याने मला धन्य वाटत आहे." हेही वाचा - Kriti Sanon-Prabhas: क्रितीने अखेर प्रभाससोबतच्या नात्याबद्दल तोडलं मौन; म्हणाली ‘माझ्या लग्नाची तारीख जाहीर…’ पुढे तो म्हणाला, ‘‘आदिपुरुषमधील प्रभासच्या व्यक्तिरेखेसाठी माझा आवाजच हवा या भूमिकेवर दिग्दर्शक ओम राऊत पहिल्या दिवसापासूनच स्पष्ट होते. प्रभू श्रीराम यांना आवाज द्यायला मिळाल्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान आणि धन्य समजतो. या गोष्टीमुळे मला खूप आनंद झाला. प्रेक्षकांनी इतकी वर्षे मला बाहुबलीचा आवाज म्हणून लक्षात ठेवले. आता यापुढे ते मला श्री रामचा आवाज म्हणून स्मरणात ठेवतील. मी भाग्यवान आहे कि श्रीराम यांनी मला त्यांचा आवाज म्हणून निवडले आहे," अशी भावना त्याने व्यक्त केली आहे. शरद केळकरने याआधी एसएस राजामौली यांच्या बाहुबलीमधील प्रभासच्या पात्रासाठी देखील आवाज दिला होता. हा चित्रपटसृष्टीतील सर्वात ब्लॉकबस्टर हिट चित्रपटांपैकी एक होता. आता आदिपुरुष मध्ये देखील शरद आपल्या आवाजही जादू दाखवणार आहे.
दरम्यान याच मुलाखतीत त्याला तेलुगू चित्रपट ‘हनुमान’च्या टीझरमध्ये प्रेक्षकांनी प्रभावी VFX पाहिल्यानंतर आदिपुरुषवर झालेल्या टीकेबद्दल विचारण्यात आले. यावर त्याने “मी माझे काम करण्यावर लक्ष केंद्रित करतो आणि या सगळ्यापासून दूर राहतो. शिवाय, मी हनुमानचा ट्रेलर पाहिला नाही, त्यामुळे मी त्यावर भाष्य करू शकत नाही.” अशी प्रतिक्रिया दिली आहे. शरद केळकर याने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. नुकताच तो हर हर महादेवमध्ये दिसला होता. यापूर्वी तो कोड नेम तिरंगा, ऑपरेशन रोमियो आणि भुजमध्येही दिसला होता. 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या लक्ष्मी चित्रपटातील त्याच्या कामाचेही खूप कौतुक झाले.